कर्नाटकातील भाविक पारंपारिक वाद्यं, लवाजम्यासह ज्योतिबा डोंगरावर
कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी डोंगरावर महाराष्ट्र सह विविध राज्यातून भाविक दाखल होत आहेत.
‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात आणि उत्साही वातावरणात ज्योतिबाची यात्रा भरण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.
तीन दिवस भरणा-या या यात्रेचा मुख्य दिवस 23 एप्रिल रोजी असून महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा ,मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं वाटचाल करू लागले आहेत. आतापासूनच डोंगरावर सासन काठ्या आणि भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.
आज कर्नाटकातील बेळगाव इथल्या पारंपारिक सासनकाठ्या आणि भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.
127 किलोमीटर आंतर चालत डोंगरावर दरवर्षी कर्नाटकातील बेळगाव इथले भाविक सासनकाठी घेऊन येतात. आता चार दिवस जोतिबा डोंगरावर त्यांचं वास्तव्य असेल. पारंपारिक वाद्यं, पताका,ढोल-ताशा, मशाल अशा लवाजम्यासह
बेळगावहून चार दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर पोहोचली.
सासनकाठी आणि भाविक दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाले. यावेळी महिलांनी भाविकांचं औक्षण केलं.
मंदिरात गावकऱ्यांनी सासनकाठीचं स्वागत केलं.
मंदिर प्रदक्षिणा काढल्यानंतर सासनकाठी मूळस्थानी रवाना करण्यात आली. या सासन काठी सोबत बेळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संखेनं उपस्थित होते.
दर्शनासाठी भाविकांनी डोंगरावर गर्दी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जिल्हा प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली असून मंदिर परिसर तसंच वाहनतळ इथं सुमारे 140 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच भाविकांसाठी पिण्याचं पाणी आणि वाहतुकीचं नियोजन करण्यात आल्याचं जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक यांनी सांगितलं.
ML/ML/PGB 21 APR 2024