३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस
मुंबई, दि. ३० : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.
विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.
सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.