‘जीवो जीवस्य जीवनम्’ या तत्वानुसार जागतिक शांततेसाठी कार्यरत शांतिसेना

मुंबई, दि. 29 (राधिका अघोर) :साधारणपणे सैनिक किंवा सैन्य म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर युद्ध, देशाचं, सीमांचं संरक्षण, पराक्रम अशा सगळ्या संज्ञा उभ्या राहतात. मात्र संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना, युद्ध नाही, तर शांततेसाठी कार्यरत सैन्य आहे. जगाने दोन महायुद्धे अनुभवली. दुसऱ्या महायुद्धातला प्रचंड मानव संहार सहन केला आणि त्यानंतर शहाण्या झालेल्या माणसांना असं जाणवलं की, अशी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेला सतत असलेला धोका, यातून अमूल्य मानवी आयुष्य आणि जागतिक शांतता आपण गमावून बसलो आहोत.
अशी युद्धे आणि अविश्वासाचे वातावरण सतत राहू नये, यासाठी, विध्वंसक शक्तींवर अंकुश ठेवला पाहिजे. याच कल्पनेतून दुसऱ्या महायुद्धानंतर, 29 मे 1948 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघांच्या शांतिसेनेचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
गेली 76 वर्षे, ह्या शांतिसेनेचे सैनिक जगभरात विविध ठिकाणी, युद्धजन्य किंवा अस्थिरर परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी झटत आहे. 1948 पासून, या मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या 20 लाखांहून अधिक सैनिकांनी, आणि सर्वसामान्य नागरिकांनी मिळून अनेक देशात शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. आजही जगातल्या अशा अस्थिर, धोकादायक ठिकाणी, 11 शांतता मिशनमधले, 70 हजारहून अधिक सैनिक तैनात आहेत. तर, आजवर 40 हजारांहून अधिक सैनिकांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या अभियानात आपला जीवही गमावला आहे.
हे सैनिक केवळ युद्धभूमीवर तैनात नसतात, तर न्याय्य, समान आणि शाश्वत जगाची उभरणी करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा वापर करून, जागतिक प्रगतीचा मार्ग सुकर करत असतात. या कामात, सैन्यदलांसोबत, पोलिस आणि नागरिकांचीही त्यांना मदत होते. ज्या ज्या देशात राजकीय संघर्ष आहेत, यादवी आहे, राजकीय पटलावर अस्थिर चित्र आहे, अशा सर्व ठिकाणी, हे सैनिक आणि त्यांचे सहकारी असलेले नागरिक, शांतता कायम राहावी यासाठी अनेक महत्वाच्या लोकांसोबत, चर्चा आणि त्यानुसार उपाययोजना करत असतात.
आज बदलत्या राजकीय आणि आर्थिक जागतिक परिस्थितीनुसार, शांतता प्रकिया अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. अशा वेळी संयुक्त राष्ट्रांची भूमिका अधिकच महत्वाची ठरते. हेच लक्षात घेऊन, यंदाच्या शांतिसेना दिवसाची संकल्पना, “ भविष्यासाठी सुयोग्य, एकत्रित उत्तम भविष्याची उभारणी” अशी आहे. गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करून, त्यातून चर्चा किंवा मुत्सद्देगिरी हा एक भाग, तर दुसरीकडे अधिक मजबूत, अद्ययावत, सर्वसमावेशक असे सैन्य उभारून, जगात अशांतता निर्माण करणारे प्रयत्न मूळापासून उखडून टाकणारी सेना, अशा दोन्ही स्तरावरून प्रयत्न होत असतात.
निसर्गाचे तत्व आहे जीवो जीवस्य जीवनम्. म्हणजे जगा आणि जगू द्या. याच तत्वाचा आधार घेत, शांतीसेनेची संकल्पना रूजली आहे. कोणत्याही देशाला स्वतः प्रगती करायची असेल, तर इतर देशांच्या प्रगतीत बाधा आणता येणार नाही. वसाहतवादी मानसिकतेतून नाही, तर एकमेकांच्या सहकार्यानेच जगाला प्रगती करता येईल. इतक्या वर्षांच्या प्रवासात मानवाने हे ज्ञान आणि परिपक्व समज आणणे अभिप्रेत आहे. ही परिपक्वता आणि परस्पर सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठीच, शांतिसेना कार्यरत असते. शांतिसेना शस्त्रही हाती घेते, ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मानव कल्याणासाठी.
जगभरातल्या अनेक देशांचे सैनिक या मिशन्स वर एकत्रित काम करतात. केवळ जागतिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी, निरपेक्ष हेतूने प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात.
या उदात्त कार्यात, भारतीय सैनिकांचा सुरुवातीपासून सहभाग राहिला आहे. शांतिसेनेच्या अनेक अभियानात, भारतीय सैनिक सहभागी होते, अनेक सैनिक या कार्यात हुतात्माही झाले. आजच्या दिवशी, या सर्व अनाम सैनिकांना, त्यांच्या कार्यासाठी आणि हौतात्म्यासाठी श्रद्धांजली आणि अभिवादन !
RA/ML/PGB 29 May 2024