जव्हारच्या वादकाचा G-20 च्या संगीतमय स्वागत कार्यक्रमात सहभाग
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने राजधानीत दाखल झालेल्या जगभरातील नेत्यांच्या स्वागत समारंभामध्ये भारतीय संस्कृतीचा परिचय घडवला जात आहे.या संगीतमय स्वागतासाठी देशभरातील ७८ वादकांचा समूह दिल्ली उपस्थित आहे. या समूहात पालघर जिल्ह्यातील जव्हार तालूक्यातील सोनू म्हसे यांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ६५ वर्षीय सोनू धवळू म्हसे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कडाचीमेट साकुर या अतिशय दुर्गम आदिवासी भागात राहतात. आदिवासी समाजातील वारली या पोटजमातीचे आहेत. आदिवासीच्या रुढी, परंपरा, संस्कृती आणि चालीरीती जोपासण्यासाठी घांगळी वाद्य वाजवण्याची तसेच त्यावर कणसरीची कथा गायन करण्याची आवड लहानपणीच त्यांच्या आजोबांकडून निर्माण झाली.
वयाच्या 16व्या वर्षापासून घांगळी वादन आदिवासी कला अवगत करून त्याची जोपासना सोनू म्हसे यांनी केली आहे. तसेच आपल्या घांगळी वादय या कलेच्या माध्यमातून आदिवासीची संस्कृती, आणि निसर्गाची जोपासना करून त्यांची अस्मिता कायम टिकून राहावी, आदिवासींच्या रुढी, परंपरा, संस्कृती, चालीरिती याचा प्रसार आणि प्रचार ते वयाच्या 16 व्या वर्षापासून जे आजतागायत करीत आले आहेत.
सोनू म्हसे यांच्या घांगळी वाद्य या कार्याचा विस्तार गावातून तालुक्याच्या पंचकोशीत गावागावात त्या बरोबर महाराष्ट्रातील विविध शहरांव्यतिरिक्त त्यांनी गुजरात, मध्यप्रदेश, आसाम, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना भेटी देऊन आदिवासी लोककलांची प्रदर्शने भरवली आहेत. आदिवासी शेतकरी समाजात शेकडो वर्षापासून चालत आलेल्या कणसरी उत्सवाची मांडणी आणि पूजा करणे. घांगळी वादयावर गायन करुन दोन रात्री दोन दिवसात कणसरी देवीच्या उत्सवाची सांगता करतात. हा उत्सव मार्गशिर्ष महिन्यात शेतकऱ्यांच्या घरी आणि खळ्यावर नागली मळून करतात. सुमारे दोनशे उत्सव पार पाडण्याचा अनुभव त्यांना आहे. तसेच चाळ सरावर मृत्यूची कथा रात्रभर सांगून पारंपारीक उत्तर कार्याचा कार्यक्रमही ते पार पाडतात.
आदिवासी समाजात घांगळी हे देव कणसरीचे सुप्रसिध्द आणि लोकप्रिय वादय असून त्यामाध्यमातून आदिवासी शेतकरी देवकणसरी उत्सव, (खळयावरचा देव) गावठाण रक्षण, क्षेत्रपाल मखर / तोरण अशा सार्वजनिक, वैयक्ती उत्सवासाठी मोठया उत्साहात साजरा करण्याची प्रथा प्रचलित असून हे मोलाचे कार्य करुन आजपर्यंत आदिवासी कला, संस्कृती, रूढी व परंपरा टिकविण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. घांगळी या वादयाच्या माध्यामाव्दारे समाजप्रबोधन करून आदिवासी समाजाला एकत्र आणून निसर्ग हाच आपला खरा पालनकर्ता आहे. तसेच आदिवासी यांच्या दैनंदिन जीवनात त्याचे महत्व काय आहे हे त्यांनी घागळी हे वादयाच्या तालावर व गायनाच्या माध्यमातून त्यानी संपूर्ण समजाला त्यांच्या या सुमधूर आदिवासी लोककलेचे प्रदर्शन घडविले आहे.
G-20 निमित्त आयोजित संगीत स्वागत समारंभात भारतभरातील 34 हिंदुस्थानी वाद्ये, 18 कर्नाटकी वाद्ये आणि 26 लोक वाद्ये यांचा समावेश आहे. 78 कलाकारांमध्ये 11 मुले, 13 महिला, सहा दिव्यांग (दिव्यांग) कलाकार, 26 तरुण पुरुष आणि 22 व्यावसायिकांचा समावेश आहे.
SL/KA/SL
9 Sept. 2023