जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक सुरूच
मुंबई दि.26( एम एमसी न्यूज नेटवर्क):मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले असून मराठा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे . अजून करताच आहेत,असा आरोप ह. भ.प. अजय बारस्कर महाराज यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.जारांगे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी मला ठार मारण्यासाठी माणसे पाठवली मला धमकावले तरीही मी मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई शेवटपर्यंत लढणार असे सांगत भारस्कर म्हणाले, जरांगे पाटील यांनी मी केलेल्या गंभीर आरोपांची उत्तरे दिली नाहीत. पाटील यांनी केलेली दुतोंडी कृती, घटना यामुळे जरांगे पाटील याचे महत्त्व कमी झाले आहे. मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी सांगितले होते की मराठा आरक्षण मिळाले तरी आजाद मैदान येथे जाणार आणि नाही मिळाले तरी आझाद मैदान येते गुलाल उधळण्यासाठी जाणार. मग जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे का आले नाहीत? कुणाच्या आदेशाने वाशीतून पळ काढला? असे सवाल भारस्कर यांनी यावेळी केले.नुकतीच आंतरवाली सराटी येथे जी गुप्त मीटिंग जरांगे यांनी घेतली त्या मीटिंगमध्ये जरांगेंना मराठा समाजाच्या लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच भाजपात गेलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे रात्री अंतरवाली सराटीत गेले असता त्यांची जरांगे पाटील यांची बंद दाराआड काय डील झाली? काही पत्रकारांना प्रवेश नव्हता. अशोक चव्हाण यांचे सोबत काय चर्चा केली ती रेकॉर्डिंग मनोज जरांगे पाटील यांनी समाजासमोर वायरल करावे अशी मागणी भारस्कर यांनी यावेळी केली.जरांगे यांची लढाई ही मराठा आरक्षणासाठी नसून राजकीय लोकांसाठी आहे. त्यांनी जाहीर केले की प्रत्येक मतदारसंघात मराठा आरक्षणाचा एक एक उमेदवार देणार आहे.या पार्श्वभूमीवर समाजामध्ये वाद सुरू झाले आहेत. ३० मार्चला अपक्ष उमेदवार हा गावच्या मंदिरात बैठक घेऊन प्रत्येक गावात जाहीर करणार ही राजकीय पहिली डील आहे असा आरोप भारस्कर यांनी केला.नवी मुंबई वाशी येथील सभेत त्यांनी दुपारच्या वेळेस उपोषण सोडले मात्र त्याच्या अगोदर रात्री त्यांनी मटण खाल्ले होते याचा पुरावा माझ्याकडे असून अनेक उपोषणात त्यांनी जेवण केले आहे असा आरोप भारस्कर यांनी केला.एसआयटी चौकशी किंवा नार्को टेस्ट झाली तर आपले यांचे सर्व काळे धंदे उघडकीस येतील.म्हणून अशोक चव्हाण यांना जरांगे शरण गेले आहेत असा आरोप बारस्कर यांनी यावेळी केला. सगेसोयरे या मुद्यांबाबत तीन महिन्यापासून जरांगे पाटील टाहो फोडत होते . कालच्या मीटिंगमध्ये सगेसोयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे असे सांगत पाटील यांनी पलटी मारली आहे हा राजकारणाचा भाग आहे असे भारस्कर यावेळी म्हणाले.