मराठा आरक्षणासाठी जरांगे समर्थकांसह मुंबईत

मुंबई, दि. २९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर त्यांनी निर्णायक आंदोलनाची सुरुवात केली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, “मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांना त्यांच्या निषेधासाठी आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. ते उद्या आणखी एक दिवस आझाद मैदानावर त्यांचे निषेध सुरू ठेवू शकतात.”
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आधी केवळ एका दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी वाढीव मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. या काळात सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे.
मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “२६ ऑगस्टपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला हव्या होत्या. आता वेळ संपली आहे. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आम्ही सरकार उलथवून टाकण्याची ताकद दाखवू.” त्यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
राज्य सरकारने यापूर्वी मराठा-कुणबी नोंदींचा अभ्यास सुरू केला होता. सुमारे ५८ लाख जुन्या नोंदी तपासल्या गेल्या असून, त्यातून काही समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरांगे यांच्या मते, ही प्रक्रिया अत्यंत संथ असून, मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे.
मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या, तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे, मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे असंही ते म्हणाले. मराठ्याची मुलं माज आणि मस्ती घेऊन आले नाहीत तर मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आले आहेत, त्याची सरकारने जाण ठेवावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं असून त्यांना आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यानंतर मनोज जरागेंनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलं. या सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.