मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छ. संभाजीनगरात दाखल

छ. संभाजीनगर दि ३– मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दीर्घकाळ उपोषणा केल्यामुळे त्यांची तब्येत खालावल्याने मंगळवार–बुधवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या सुरू केल्या असुन किमान पंधरा दिवस उपचारांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

अपेक्षित गर्दीचा अंदाज घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी समर्थकांना रुग्णालय परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून उपचार प्रक्रियेत अडथळा येणार नाही.
दरम्यान, जरांगे पाटील रुग्णालयात पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. गुलाल उधळण्यात आला, फटाके फोडण्यात आले आणि मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषामुळे परिसरात वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मात्र, गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी फटाक्यांच्या रोषणाईत व ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. तथापि, काही नेत्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तरीही, या आंदोलनाच्या यशामुळे मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला नवा ऐतिहासिक टप्पा प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.ML/ML/MS