विधानसभा निवडणुकीतून जरांगेंची माघार…
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एका जातीवर निवडणूक लढवणं अशक्य आहे आणि सहयोगी लोकांकडून त्यांच्या याद्या आल्या नाहीत अशी कारणे देत मराठा आरक्षणावर आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असून सर्व मराठा आंदोलक उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याची सूचना केली आहे.
आपल्याला निवडणूक लढवायची नाही तो आपला खानदानी धंदा नाही असेही त्यांनी सांगितले मित्र पक्षांची यादी न आल्याने जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचा काहीच उपयोग नाही, दोन्ही सारखेच आहेत असे ते म्हणाले. आपल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कोणीही ठेवू नका, कोणत्याही अपक्षाला, राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याच जागेवर आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तुमच्या मतदार संघातील ज्याला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, त्या उमेदवारा कडून पाठिंब्याचा बाँड किंवा व्हिडिओ तयार करून घ्या. समाज माझ्या लक्षात आला की माझ्या डोक्यात पाणी यायचं. तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पाडा, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा… यांना चोट्यांना निवडणूकीसाठी एकत्र यावं लागतं, यांना चोट्टे जवळ करावे लागले असे जरांगे यावेळी म्हणाले.
राजकीय प्रक्रिया वेगळी आहे, जो 400 पार म्हणत होता, त्याने त्यांचे घेतलं फाटून… आंदोलन करताना 1000/ 500 जमले असेल तरी जमतं, पण निवडणुकीत मतदानाची गोळा बेरीज करावी लागते… राजकारणाची प्रक्रिया वेगळी, आणि सामाजिक कार्याची प्रक्रिया वेगळी आहे. मात्र मराठ्यांचा दबदबा कायम राहणार, मराठ्यांना विश्वासात घेतलं नाही की पडलाच असे उमेदवारांनी समजावे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करून सोडणार आहोत, कोणाच्याही प्रचाराला, कोणाच्याही सभेला जायचं नाही, मराठ्यांच्या माणसांनी मतदानाच्या दिवशी जायचं आणि आपलं मतदान करून यायचे, कोणाच्याही मागे फिरायचे नाही, गुपचुप जायचे आणि मतदान करून माघारी यायचे, ही लाईन मराठा समाजाने लक्षात घ्यावी अशी सूचना जरांगे यांनी यावेळी केली .
ML/ML/PGB
4 Nov 2024