जपानमध्ये जन्मदरांचा नीचांकी विक्रमी

टोकीओ, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक प्रगत राष्ट्रामध्ये गणना होणारे जपान सध्या भविष्यातील मनुष्यबळाच्या चिंतेने त्रस्त आहे. मुलांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जपणारे जपानी सरकार जन्मदर वाढावा यासाठी नागरिकांची मनधरणी करत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. जपानमधील जन्मदर घट हे देशापुढील मोठे आव्हान ठरले आहे. लोकांचा मुले होऊ न देण्याकडे कल असल्यामुळे देशातील जन्मदर विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नवीन आकडेवारीनुसार सुमारे १२ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात गेल्या वर्षी केवळ ७ लाख २७ हजार २७७ मुलांचा जन्म झाला.
जन्मदरातील अभूतपूर्व घट कमी करण्यासाठी जपान सरकार विविध प्रयत्न करत आहे.जपानमध्ये मुले कमी जन्माला येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे लोक विवाह करण्यापासून लांब रहाणे पसंत करत आहेत. तर घटस्फोट घेणार्यांची संख्या वाढत आहे.जपानचा प्रजनन दर गेल्या अनेक वर्षांपासून घसरत आहे.आता तो विक्रमी नीचांकी पातळीवर पोचला आहे.
देशातील प्रजनन दर गेल्या वर्षी १.२६ टक्के इतका होता.तो चालू वर्षी १.२० टक्क्यांवर आला आहे. लोकसंख्या स्थिर रहाण्यासाठी प्रजनन दर २.१ टक्के असणे आवश्यक आहे.लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी जपान सरकारने तरुणांना विवाह करण्यासाठी आणि कुटुंब चालू करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यासाठी सरकारने स्वतःचे ‘डेटिंग अॅप’ही चालू केले आहे. तसेच बालसंगोपन सुविधांचा विस्तार करणे, पालकांना गृहनिर्माण अनुदान देणे आणि मूल जन्माला आल्यावर पालकांसाठी अनुदान यांसारखे उपक्रमही सरकारने सुरू केले आहेत.
ML/ML/SL
12 June 2024