जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 तासांत पूर्ण केली हाफ मॅरेथॉन
श्रीनगर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काश्मीर हाफ मॅरेथॉन शर्यतीत धाव घेतली. श्रीनगरच्या पोलो स्टेडियमवरून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी 21 किलोमीटरची शर्यत 2 तासांत पूर्ण केली. ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, “आज मी स्वतःवर खुश आहे. तणाव कमी करण्यासाठी औषधांची गरज नाही. चांगले धावणे तुम्हाला उत्साहाने भरण्यासाठी पुरेसे आहे, मग ती किलोमीटरची धाव असो किंवा मॅरेथॉन. नशा मुक्त जम्मू-काश्मीरसाठी आपण धावायला सुरुवात केली पाहिजे.”
मुख्यमंत्री म्हणाले- 21 किलोमीटरची शर्यत सरासरी 5 मिनिटे 54 सेकंद प्रति किलोमीटर वेगाने पूर्ण केली. आयुष्यात 13 किलोमीटरपेक्षा जास्त धावलो नव्हतो. माझ्यासारख्या इतर हौशी धावपटूंच्या उत्साहाने प्रेरित होऊन आज मी धावत राहिलो. प्रशिक्षण नव्हते. कोणतेही नियोजन नव्हते. वाटेत एकच केळ आणि एक-दोन खजूर खाल्ले.
SL/ML/SL
20 Oct. 2024