बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातील पत्रकार कक्षात येऊन पत्रकार परिषद संबोधित केली. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आवर्जून हा मुद्दा उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय , विधिमंडळ वार्ताहर संघाच्या ९ मे २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सन्मान निधी वाढविण्याची घोषणा केली होती.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्च २०२४ मध्ये राज्य सरकारने राज्यातील निवृत्त पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्माननिधी योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम रुपये ११ हजारांऐवजी २० हजार रुपये करण्याचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे अध्यक्ष डोईफोडे यांनी निदर्शनास आणले. महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा सन्मान केला तसा सन्मान राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा करून त्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी डोईफोडे यांनी केली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीचे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच २० हजार रुपये दरमहा सन्माननिधी देण्यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कार्यवाही केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांना याचा फायदा होणार आहे. सन्मान निधीत वाढ करून ते ११ हजाराऐवजी २० हजार रुपये करण्यात यावे तसेच शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने पाठपुरावा केला होता.
संघाच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. यावेळी सरचिटणीस प्रविण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव, कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड, भगवान परब, अलोक देशपांडे, मनोज मोघे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार
ML/ML/PGB
8 Dec 2024