जालना – मुंबई वंदे भारत आजपासून सेवेत
जालना, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जालना रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
रेल्वेच्या प्रवाशाना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आधुनिक सुविधा असलेली वंदे भारत रेल्वे आजपासून जालना येथून सुरू झाली आहे. यावेळी जालना स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री दानवे, उपमुख्यमंत्री फडणवीस,मंत्री अतुल सावे,आमदार नारायण कुचे,हरिभाऊ बागडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी,
पदाधिकारी,कार्यकर्ते,जालना शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
जालना–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाड्यातून सुरू होणारी पहिली वंदे भारत ट्रेन सेवा आहे. मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही महत्त्वाची शहरे मुंबई सोबतच मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर या राज्यातील महत्त्वाच्या शहरांनाही ती जोडणार आहे.
जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली ही ट्रेन रेल्वे वापरकर्त्यांना सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणार आहे. स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे,सर्व श्रेणी मध्ये आरामदायी गादीयुक्त आसन, चेअर कारमध्ये रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये 360 डिग्री रिव्हॉल्व्हिंग सीट्स, पूर्णपणे वातानुकूलित डबे,रुंद आकाराच्या खिडक्या प्रवासा दरम्यान दोन्ही बाजूचे विहंगम दृश्य दिसेल अशा असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच्या असंख्य सुविधा असलेली ही ट्रेन आज सायंकाळी मुंबईत पोहोचली तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यात आले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छ. शिवाजी महाराज स्थानकावर यासाठी उपस्थित होते.
ML/KA/PGB 30 Dec 2023