जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका, शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान …

जळगाव दि १७– जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे ४६९ पशुधनांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ‘जोर ‘धारांनी कहर केला आहे. पाचोरा व जामनेर तालुक्यात दमदार पावसामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला. तर घरांची मोठी पडझड झाली. पूरपरिस्थितीमुळे जामनेर-पाचोरा आणि जामनेर-जळगाव मार्गावरची वाहतूक बाधित झाली आहे. पावसामुळे एस.टी.च्या १०३ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पाचोरा तालुक्यातील सातगाव, शिंदाड, निंभोरी, राजुरी, वाणेगाव यासह परिसरातील गावांना मुसळधार पावसासह पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. तर जामनेर तालुक्यातील नेरी गावाला मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टरवरील खरीप पिके यासह २१ कच्च्या घरांची पूर्णतः, तर ७३ घरांची अंशतः पडझड झाली आहे. ५ झोपड्या तर ११ गोठे जमीनदोस्त झाले आहेत. दोन दिवसांच्या पावसात पाचोरा तालुक्यातील २६२ कुटुंबे बाधित झाली आहेत.
जामनेरसह पाचोऱ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी दाखल झाली आहे. पूरग्रस्त भागात या पथकाकडून मदतकार्य राबविले जात आहे. तरी लवकरात लवकर शासनाने मदत करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.ML/ML/MS