जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदाकाठच्या गावांत पाणी

छ. संभाजीनगर दि २८ – पैठणच्या जायकवाडी धरणातून आज सकाळपासून तब्बल सव्वा दोन लाख क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नवगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी, हिराडपुरी, नायगाव आणि उंचेगाव या गावांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे.
धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, जोरदार वेगाने पाणी सोडल्याने पैठण शहरातील सखल भाग जलमय झाले आहेत. शहरातील नाल्यांमार्फत गोदावरीचे पाणी घुसल्याने रस्ते जलमय झाले आहेत. संत एकनाथ महाराज समाधीकडे जाणारे रस्ते, गागाभट्ट चौकातून नगरपरिषदेकडे जाणारा मार्ग याठिकाणीही पुराचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या भागांतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.ML/ML/MS