जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंधक दिन- झाडे लावा, झाडे जगवा
मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) :देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत, एक त्रास सगळ्यांनी प्रचंड सहन केला असला, तरीही, निवडणुकीच्या धामधुमीत त्याची फार चर्चा झाली नाही. तो त्रास म्हणजे प्रचंड वाढलेला उकाडा. यंदाच्या उन्हाळ्यात, देशातल्या अनेक शहरांमध्ये तापमानानं उच्चांकी आकडा गाठला. उष्णतेच्या काहिलीने अनेकांचे बळी घेतले. आणि आता जून अर्धा झाला तरी, उत्तरेत अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. जगभरात वाढत असलेले जमिनीचे वाळवंटीकरण आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप, हे देखील या हवामान बदलाचेच परिणाम आहेत आणि त्याची झळ आज ना उद्या आपल्यालाही बसणार आहेच.
सगळ्याच देशांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेल्या, जमिनीचे वाळवंटीकरण आणि त्यामुळे होणारा दुष्काळ या समस्येवर जनजागृती व्हावी, उपाययोजना केल्या जाव्यात, या दृष्टिनं संयुक्त राष्ट्रसंघानं, 17 जून हा दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंधक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1992 च्या रिओ वसुंधरा शिखर परिषदेत पहिल्यांदा ह्या समस्येवर गांभीर्यानं चर्चा झाली. तेव्हापासून ह्या दिवशी ह्या विषयाबाबत जनजागृती केली जाते.
वाळवंटीकरण म्हणजे चांगल्या सुपीक जमिनीचे हळूहळू भरड, नापीक, वाळवंटी जमिनीत होणारे रूपांतर. याचा अर्थ जगातील वाळवंटे वाढत आहेत, असा नाही, तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे हळूहळू जमिनीची धूप होत जाते, आणि नंतर ती जमीन ओसाड बनते. याचा परिणाम अर्थातच, भूमीची उत्पादकता कमी होणे, पिकांवर परिणाम आणि त्यामुळे जैवविविधताही धोक्यात येण्यावर होतो.
या वाळवंटीकरणामागची कारणे काय? तर, अधिकाधिक जमिनीचा चराईसाठी वापर झाला, तर त्यामुळे, त्या भूमीवरील वनस्पतींची जैवविविधता संपते, आणि हळूहळू ती भूमी ओसाड होत जाते.
गेल्या काही वर्षात भारतात सुमारे 30 टक्के चराई क्षेत्र घटले आहे. त्याशिवाय झाडांची कत्तल, विकासकामे, बांधकामे रस्ते बांधणी यासाठी होणारी झाडांची, ते ही वर्षानुवर्षे जुन्या देशी झाडांची होणारी कत्तल, जमिनीची धूप वाढवते, पर्यायाने जमीन ओसाड बनत जाते. त्याशिवाय शेतातले अवशेष, झाडांचा कचरा, मातीत नैसर्गिकपणे मुरू न देता, तो जाळून टाकण्यानेही जमिनीतील सत्व जळून जाते. त्याशिवाय खते-कीटकनाशकांचा अतिवापर, हवामान, पूर, जमीन वाहून जाणे, सातत्याने पडणारा दुष्काळ यामुळेही जमिनीचं वाळवंट होणार आहे, अशी धोक्याची घंटा वाजते.
यंदाच्या जागतिक, वाळवंटीकरण आणि जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिनाची संकल्पना, “ भूमीसाठी आम्ही एकत्र: आमचा वारसा, आमचे भविष्य” अशी आहे. आणि या संकल्पनेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भारतच आहे. भूमी, निसर्ग केवळ एक संसाधन म्हणून नाही, तर त्याकडे देव म्हणून पाहणारी, या पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व देणारी आपली संस्कृती आहे. मात्र देशाची प्रगती करतांना, आपल्याला आपल्या याच वारशाचे विस्मरण झाले आहे. त्याचेच पुन्हा स्मरण करून देण्याची गरज आहे. विकास आणि चंगळवादी दृष्टिकोन यातला भेद समजून घेण्याची गरज आहे. बहुजनांचे व्यापक हित डोळ्यांसमोर असतांना, भारतासारख्या देशात सार्वजनिक सुविधा, विकासकामांना कोणीच विरोध करु शकणार नाही. मात्र, पहिले घर, दुसरे मग तिसरे, सेकंड होमच्या नावाखाली थंड हवेच्या ठिकाणीही ज्या प्रकारे झाडांच्या कत्तली केल्या जातात, बांधकाम व्यावसायिकांना धडाधड झाडे कत्तलीची परवानगी देणे, ही सगळी कारणे आहेत.
जेव्हा एखाद्या घटनेची कारणे समोर असतात, तेव्हा त्याचे उपायही दिसत असतात. झाडे लावणे, नद्यांचे, नैसर्गिक संसधानांचे डोंगररांगांचे पासून ते जमिनीवर उगवणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या वनस्पतींचे संरक्षण करणे हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय. मात्र, हा म्हणायला सोपा, मात्र न केला जाणारा उपाय. खरं तर, पर्यावरणामुळे वाढलेल्या दुष्काळाची झळ जवळपास सगळ्यांना बसते आहे. या सर्वनाशाच्या यादीत आपलं नाव आलेलं आहे. तरीही आपण, आपल्याच शरीराचे लचके तोडून खाणाऱ्या प्राचीन शापित ग्रीक देवतेसारखे, आपलीच भूमी कुरतडून खातो आहोत. ही भूमी संपल्यानंतर जाग आली तर आपल्यासाठीही काहीच शिल्लक नसेल. म्हणूनच, आज वेळ हातात असतांना भूमीचे वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखण्यासाठी सामूहिक शहाणीव दाखवत, पावले उचलायला हवीत.
ML/ML/PGB 17 Jun 2024