जागतिक वारसा दिन : आपल्या वारशावर प्रेम करा, त्यांचा सन्मान करा.

 जागतिक वारसा दिन : आपल्या वारशावर प्रेम करा, त्यांचा सन्मान करा.

मुंबई, दि. 18 (राधिका अघोर) :आज जागतिक वारसा दिन आहे. प्रत्येक देशाचा, समाजाचा आपला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असतो, हा वारसा आपली ओळख असते, ज्यातून आपल्या भविष्याचा मार्ग आपल्याला सापडतो. म्हणूनच ह्या वारशाचे जतन आणि संवर्धन अत्यंत महत्वाचे असते. हाच विचार करुन, युनेस्कोने १९८२ साली, १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

आपण घरात आपल्या वडीलधाऱ्या लोकांशी बोलतो, जेव्हा ते आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला सांगतात, त्यावेळी, आपल्याला छान वाटतं, आपल्या पूर्वजांच्या सुरस रम्य कथा आपल्याला रोमांचित करतात, आपल्याला तो काळ बघता आला, तर किती छान होईल, असे विचार आपल्या मनात येतात. जसा आपला घराण्याचा इतिहास असतो, तसाच, आपल्या देशाचाही एक इतिहास असतो. हा इतिहास, आपली वारसास्थळं आपल्यासमोर जिवंत करतात. शिवरायांचे गडकिल्ले पाहतांना, शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला असेल, पन्हाळ्यावर त्यांनी पराक्रम गाजवला असेल, प्रतापगडावर अफजलखानाला कसं मारलं असेल, असे विचार आपल्या अंगावर रोमांच उभे करतात, शिवरायांचा दैदिप्यमान काळ आपल्यासमोर उभा राहतो.

झाशीला गेल्यावर, झाशीच्या राणीचा पराक्रम आठवतो, तर जालियाँवाला बागमध्ये आपले डोळे आजही पाणावतात. कधीही, कुठेही न पाहिलेल्या लोकांशी आपले बांध जुळतात. भारतातली प्राचीन संस्कृती म्हणून मनाली जाणारी सिंधू संस्कृती, ज्या सिंधू नदीच्या काठावर वसली, ती नदी आजही वाहते आहे, जणू, आपल्या वारशाचा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. हेच असतं, आपल्या वारशाचं महत्त्व ! खजुराहोची लेणी असोत, किंवा हंपी मधल्या भग्न मूर्तींचे अवशेष, कोणार्कचे मंदिर असो किंवा अजिंठा वेरूळच्या लेणी, आपले पूर्वज किती समृद्ध होते, ज्ञानी होते, याची प्रचिती आपल्याला येते आणि त्यांच्यासारखेच होण्याची प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच, आपला वर्तमानकाळ समृद्ध होण्यासाठी, हा वारसा जपायला हवा, असं सांगणारा हा दिवस आहे.

यंदाच्या जागतिक वारसा स्थळ दिनाची संकल्पना आहे- आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा ! आपली सगळी वारसाथळे, स्मारके, स्मृतिस्थळे प्राचीन आहेत, त्यांचे जतन आणि संवर्धन करावे लागतेच. मात्र, अलिकडे काळाशिवाय आणखी दोन धोके या वारसास्थळांना निर्माण झाले आहे, ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि युद्धासारखे मानवी संघर्ष. हवामान बदलांमुळे अलिकडच्या काळात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा आपत्तीमध्ये आपल्या साधन सामग्री चे नुकसान तर होतेच; शिवाय जुन्या वारसा स्थळांचेही नुकसान होते. त्यांची नैसर्गिक झीज होत असते, त्याशिवाय, आताच्या प्रदूषित, रसायनमिश्रीत हवेचाही ह्या स्थळांवर परिणाम होतो. जसे की ताजमहालाच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवारावर आलेले पिवळेपण.

अशा धोक्यांपासून ह्या वारसस्थळांचे संरक्षण करायचे असेल, तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी. त्याच्या मदतीने, ह्या स्थळांचे प्राचीनत्व जपत, त्यांची डागडुजी करायला हवी.
वारसा स्थळांना दुसरा धोका असतो, तो मानवनिर्मिती संघर्ष – ज्यात यादवी युद्ध असेल किंवा दोन देशांचे एकमेकांवर होणारे हल्ले. आजच्या काळात असे हल्ले करण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरली जाणारी आयुधे इतकी संहारक असतात, की त्यामुळे अशी वारसा स्थळे नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. कधीकधी एखाद्या देशावर आक्रमण झाले की, त्या देशांतील वारसा स्थळे, संस्कृती नष्ट करण्याचा आक्रमकांचा हेतू असतो.

भारतात नालंदा विद्यापीठ, अफगाणिस्तान मधली बामियान सांस्कृतिक मूर्ती याचेच उदाहरण आहे.
त्यामुळे, अशा मानवनिर्मिती संकटांपासून सुद्धा आपल्या वारशाचे संरक्षण करायला हवे.
यावर्षी ‘आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिवसानिमित्त’, 18 एप्रिल रोजी भारतातील एएसआय स्मारकांना भेट देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा एएसआय, म्हणजेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केली आहे.
या उपक्रमाचा उद्देश पर्यटकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. देशातील 3,698 स्मारके आणि स्थळे संरक्षित करून, एएसआय देशाच्या ऐतिहासिक वारशाविषयी आणि अतुलनीय स्थापत्यकलेविषयी जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

प्रवेशशुल्क माफ करण्यामुळे, आपल्या मूर्त वारशाचे संवर्धन आणि व्यवस्थापन याविषयी अधिक लोकजागृती तसेच आपल्या वारसा संवर्धनात नागरिकांची सक्रिय भूमिका याविषयी जाणीवजागृती करण्यात साहाय्य मिळू शकेल, अशी एएसआयची अपेक्षा आहे. आपल्या संविधानात घालून दिलेल्या मूलभूत कर्तव्यांनुसार, या अमूल्य वारसा स्थळांचे संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपले योगदान देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

आपल्या वारसा स्थळांना भेट द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचे संरक्षण करा.

ML/ML/PGB 18 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *