जे.जे.च्या निवासी डॉक्टरांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (न्यूरोलॉजी) म्हणजे डीएम न्यूरोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त जागा भरल्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) जे.जे. रुग्णालयातील या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या डिसेंबर २०२२ मध्ये भरलेल्या जागांवरील प्रवेश २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, त्याचा रुग्णसेवेवरही परिणाम होणार असल्याने जे.जे. रुग्णालयातील डीएम न्यूरोलॉजीच्या निवासी डॉक्टरांनी एनएमसी आणि जे.जे. रुग्णालय प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जे.जे. रुग्णालयामध्ये डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमासाठी दोन जागा मंजूर असताना गतवर्षी रुग्णालय प्रशासनाकडून डीएम न्यूरोलॉजी समुपदेशनासाठी सीट मॅट्रिक्स भरताना दोनऐवजी तीन जागा नमूद केल्या होत्या. परिणामी गतवर्षी न्यूरोलॉजी अभ्यासक्रमासाठी तीन डॉक्टरांना प्रवेश मिळाले. रुग्णालय प्रशासनाच्या या चुकीमुळे एनएमसीने जे.जे. रुग्णालयातील डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमाच्या जागांवर गतवर्षी झालेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गतवर्षी प्रवेश घेतलेल्या कोणत्याही निवासी डॉक्टराला डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही. जे.जे. रुग्णालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे गतवर्षी प्रवेश घेतलेल्या निवासी डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या विद्यार्थ्यांच्या वतीने ॲड. कल्पना कान्हेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आह.
जे.जे. रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभाग हा सर्वात जुना विभाग आहे. या विभागामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. एनएमसीच्या या निर्णयामुळे जे.जे. रुग्णालयामध्ये डॉक्टरांची कमतरता भासणार आहे. तसेच डीएम न्यूरोलॉजी विभागातील निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडेल. तसेच रुग्णसेवेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांऐवजी या अतिरिक्त प्रवेशासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी विनंती याचिकेद्वारे न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
ML/KA/PGB 13 Oct 2023