उ.प्रदेशातील कावड यात्रामार्गावरील उपहारगृहमालकांना नावाची पाटी लावणं बंधनकारक
लखनौ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील योगी सरकार नेहमीच वेगवेगळे अप्रचलित निर्णय घेऊन विरोधकांच्या टिकेचे धनी ठरत असते. आता या सरकारने उत्तर प्रदेशात कावड यात्रा मार्गावरील सर्व उपहारगृहाच्या मालकांना त्यांची स्वतःची नावे लावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक खाद्यपदार्थाचे दुकान किंवा खाद्यपदार्थाच्या गाडी मालकाला ठळकपणे स्वतःचे नाव लावणे बंधनकारक झाले आहे. मुजफ्फरनगर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या या वादग्रस्त आदेशामुळे सरकारवर टिकेची झोड उठली आहे. विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयावर टिका केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी यूपी सरकारच्या या आदेशावर टिका केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे समाजात एकप्रकारे अस्पृश्यता वाढेल असं नक्वी यांनी म्हटलं आहे. ‘काही अतिउत्साही अधिकाऱ्यांनी घाईघाईने आदेश काढल्यामुळे अस्पृश्यतेसारख्या आजाराला जन्म मिळू शकतो. प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे. पण अस्पृश्यतेला संरक्षण दिले जाऊ नये’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते नक्वी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिली आहे. मुख्तार नक्वी यांनी कावड यात्रेत सहभागी होतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर पोलिसांनी कावड यात्रा मार्गावरील फळ विक्रेत्यांना असाच एक आदेश दिला होता. या आदेशानुसार प्रत्येक फळ विक्रेत्याने स्टाॅलवर त्याचे स्वतःचे नाव लिहिणे बंधनकारक केले होते. दरम्यान, या निर्णयावर सुद्धा जोरदार टिका झाल्यानंतर पोलिसांनी तो आदेश मागे घेतला होता. मुजफ्फरनगर पोलिसांनी फळ विक्रेत्यांना दिलेल्या आदेशामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये, असे मत केंद्रातील भाजपचा प्रमुख मित्रपक्ष असलेला जनता दल (युनायटेडचे) राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी व्यक्त केले होते.
SL/ML/SL
20 July 2024