ISRO चे आदित्य-L1 मिशन या दिवशी होणार लाँच
श्रीहरीकोटा. दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग होऊन प्रज्ञान रोव्हरचे काम सुरळीतपणे सुरू झाल्यावर आता ISRO सूर्याशी संबंधित संशोधनाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार केलेला उपग्रह आदित्य-L1
2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार आहे.इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता आदित्य-L1 चे प्रक्षेपण होईल.हे पाहण्याठी सर्वसामान्य नागरिकही नोंदणी करू शकतात. गॅलरीत बसून प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक देखील जाहीर केली आहे. सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), आदित्य L1 मोहिमेसाठी एक प्रमुख साधन, पुणे स्थित इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ने विकसित केले आहे.
या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल.
या मिशनसाठी ४०० कोटींमध्ये सौर वेधशाळा तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह सुर्यावरील उष्णता लहरी आणि सूर्यावर येणाऱ्या वादळांवर नजर ठेवणार आहे.याबाबत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की ‘आदित्य एल-१’सूर्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह आपल्याला सूर्याच्या विद्युत चुंबकीय प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सुचना आधीचं देईल. जर वेळेच्या आधी सुचना मिळाली तर उपग्रह, बाकीचे विद्युत साधनांना नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते.अंतराळात भारताचे पन्नासपेक्षा जास्त उपग्रह आहेत. ज्याची किंमत ५०,००० कोटींपेक्षा जास्त आहे, आदित्य एल-१’ हे मिशन या उपग्रहांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
SL/KA/SL
28 Aug 2023