इस्रायलकडून हमासविरोधात युद्धाची घोषणा
जेरुसलेम, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले – हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच जिंकू. याची किंमत शत्रूंना चुकवावी लागेल. यानंतर इस्रायली लष्कराने हमासच्या ठाण्यांवर लढाऊ विमानांनी हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हमासने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह 7 शहरांवर 5 हजार रॉकेट डागले. मात्र, गाझा पट्टीतून 2,200 रॉकेट डागण्यात आल्याचे इस्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, हे रॉकेट निवासी इमारतींवर पडले. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 545 जण जखमी झाले आहेत.या भयंकर पार्श्वभूमीवर इस्रायलीने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून इस्रायलविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. येथे इस्त्रायली लष्कराने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड’ सुरू केले आहे. लष्कर हमासच्या ठाण्यांवर हल्ले करत आहे.
इस्रायलमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांसाठी एक सल्ला जारी केला आहे. त्यांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले आहे. कठीण काळात भारत इस्रायलच्या जनतेसोबत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलमध्ये हमास या दहशतवादी संघटनेकडून रॉकेट हल्ले होत असताना भारताच्या इस्रायलमधील दूतावासानं तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावासानं यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली असून त्यात इस्रायलमधील भारतीयांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“इस्रायलमधील सध्याची परिस्थिती पाहाता तेथील भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सुरक्षा नियमावलीचं भारतीयांनी काटेकोरपणे पालन करावं. भारतीयांनी काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नये. आपल्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित आश्रयाच्या जवळच राहावं”, असं या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
SL/KA/SL
7 Oct. 2023