इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
तेहरान, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले. रईसी हे काल अझरबैजान येथून तेहरानला परतत असताना त्यांचे हॅलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाले होते. १७ तासांनंतर आज बचाव पथकांना त्यांच्या हॅलिकॉप्टरचा शोध लागला. हॅलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या अपघातात रईसी यांच्यासह कोणीही वाचले नाही. या हेलिकॉप्टर अपघातामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप इराणने केला आहे.
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रईसी यांच्या हॅलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता घडला.त्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र धुके आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.
इराणच्या प्रेस टिव्हीने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.बचाव पथकाने राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या हॅलिकॉप्टरचा शोध लावला आहे. त्यांना घटनास्थळी कोणीही जिवंत आढळले नाहीत . रईसी यांच्या ताफ्यात तीन हॅलिकॉप्टर होती. त्यापैकी दोन सुखरुप परतली. मात्र रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहीयन ज्या हॅलिकॉप्टरमध्ये होते ते कोसळले.
इब्राहीम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय होते. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच रईसींनी अनेक आंदोलनांमध्ये तसेच चळवळींमध्ये सहाभाग घेतला होता. रईसी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले.
SL/ML/SL
20 May 2024