दुष्काळी भागात बहरली इराणी खजुराची शेती….
जालना, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना जिल्हा हा सतत दृष्काळी म्हणूनच ओळखला जातो.यात जिल्ह्यातील घनसावंगी तालुका मुख्यता मोसंबी आणि ऊसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो, पण पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने मोसंबीचे क्षेत्र घटले आणि गोदा पट्यातील काही भाग सोडला तर इतर भागात पाणी टंचाईचे संकट गहिरे होत चालले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडला आहे.या पाणी टंचाईवर मात करत काही शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील दामोदर शेंडगे यांनी आपल्या ३ एकर जमिनीवर इराण, इराकच्या खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय.चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ ला दामोदर शेंडगे यांनी २५ बाय २५ च्या अंतरावर २०० खजुराच्या रोपांची लागवड केली.त्यावेळी वर्षातून २ वेळा फक्त शेणखत देण्यात आले. कुठलाही रासायनिक फवारा, कुठलेच खत, औषधाची मात्रा देण्याची गरज खजूर लागवडी नंतर देण्याची गरज पडली नाही. ३८ महिन्यानंतर या झाडाला फुले यायला सुरुवात झाली आणि पहिल्याच बहरात गेल्यावर्षी शेंडगे यांना ५ टन खजुरातून जवळपास ८ लाखांचे उत्पन्न झाले होते.
या ३ वर्षात शेंडगे यांनी आंतरपीक म्हणून सोयाबीन,गहू पीक घेऊन आपल्या पारंपरिक पिकातून उत्पन्नही घेतल्याने खजूर लागवडीची अडचण आली नाही हे विशेष. त्यामुळे त्यांनी केलेला हा आधुनिक शेतीतला हटके प्रयोग तुफान यशस्वी झाल्याने आता महाराष्ट्रासह पर राज्यातील शेतकऱ्यांचे पाय शेंडगे यांची खजूर शेती पाहण्यासाठी वळू लागले आहेत.
पहिल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनांवर या वर्षी एका एका झाडावर खजुराचे १६/१८ घोस लागल्याने यावर्षी तर त्यांचे उत्पन्न दुप्पट होते आहे.यावर्षी जवळजवळ १० ते १२ टन उत्पन्न होणार असून त्यातून किमान १८/२० लाखाचे उत्पन्न होण्याची दामोदर शेंडगे यांना अपेक्षा आहे.जालन्यासारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या भागात इराण, इराकची खजूर शेती फुलते आहे ही पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी संधी असेल यात वाद नाही.
खजूर हे प्रामुख्याने इराण आणि सौदी अरेबिया सारख्या आखाती देशात उत्पादित होते.शेंडगे यांनी २०१९ मध्ये खजूर लागवड केली त्यावेळी खजुराचे रोप त्यांनी इराणमधून मागवले.वाहतुकीच्या खर्चासह त्यावेळी त्यांना ४२२५ रुपये प्रति नग खर्च आला होता. २०१९ मध्ये २५ बाय २५ या अंतरावर तीन एकर जमिनीवर २०० रोपांची त्यांनी लागवड करण्यात आली होती.खजूरच्या पिकाला त्यांनी शेणखत व्यतिरिक्त कोणतेच खत दिलेले नाही. वर्षातून फक्त दोनदा शेणखताची मात्रा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर तीन वर्षांच्या काळात या खजूर पिकाला चांगली फळधारणा झाल्याने जून २०२३ मध्ये खजूर पिकावरील फळे विक्रीसाठी तयार झाली.
सुयोग्य नियोजन केल्यामुळे त्यांना या खजूर पिकातून पहिल्या वर्षातच विक्रमी उत्पन्न मिळाले.त्यांचे शेत रस्त्याशेजारी असल्याने रस्त्याला स्टॉल लावून त्यांनी खजुराची विक्री केली.त्यातून त्यांना ८ लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते.यावर्षी बहार प्रचंड वाढल्याने १० ते १२ टन उतपन्न होत असून यातून १०/१२ लाखांचे उत्पन्न होणार आहे.सतत दुसऱ्या वर्षी विक्रमी पीक येत असून या झाडाचे आयुष्यमान जवळपास ७० ते ८० वर्षाचे असून कुठल्याही रासायनिक फवारे,औषधी यांची गरज नसून फक्त वर्षातून २ वेळेस शेण खताची मात्रा देत असल्याचे शेंडगे सांगतात. या शेतीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता नसून ते आणि त्यांचा मुलगा जगदीश हे दोघे फक्त १ ते दीड महिना खजूर झाडांना तुरे आल्यानंतर त्याचे पोलन करण्याच्या वेळी लक्ष ठेऊन स्वतः पोलन चे काम करतात. यासाठी प्रत्येक २० झाडामागे १ नर जातीचे झाड लावले जाते. दरम्यान झाडांना तुरे लागल्यानंतर या नर झाडाचा एक तुरा काढून इतर मादी झाडांच्या तुऱ्यामध्ये ठेवावा लागतो. अशा पद्धतीने याचे पोलन केले जाते आणि मग तेव्हाच उत्तम प्रतीचे खजूर मिळतात त्यामुळे स्वतः लक्ष ठेऊन ही प्रक्रिया करत असल्याचे शेंडगे सांगतात.
थोडक्यात काय तर पाण्याचे दुर्भिक्ष,नैसर्गिक आपत्ती, मनुष्यबळाचा अभाव या सगळ्या समस्यांवर मात करून पारंपरिक शेतीसह जमिनीच्या इंच न इंच भागाचा उपयोग करून घेत कमी पाण्यात विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयोग दामोदर शेंडेगे यांनी यशस्वी केल्याने शेतकऱ्यांपुढे अश्या यशस्वी शेतीचा पर्याय त्यानी उभा केलाय.शेंडगे यांच्या प्रयोगशील शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्यामुळेच राज्याच्या विविध भागातून शेतकरी तनवाडी येथे येऊन ही शेती समजावून घेत आहेत.
ML/ML/SL
20 April 2024