उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!

मुंबई दि २९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव (1200 मेगावॅट) , पानशेत (1600 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडून मुतखेड (110 मेगावॅट), निवे (1200 मेगावॅट) , वरंढघाट (800 मेगावॅट) येथे तर अवादा अॅक्वा बॅटरीजकडून पवना फल्याण (2400 मेगावॅट) आणि सिरसाळा (1250 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील.
मुख्यमंत्री म्हणाले, “उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेती, उद्योग तसेच व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल आणि पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. राज्याच्या ऊर्जा क्षमतेपैकी 50% अपारंपरिक स्त्रोतांतून निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.” यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.