ठाणे पालिका रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती

सातारा, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे आणि आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. Investigation committee in the case of death of patients in Thane Municipal Hospital
सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते.
वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
13 Aug 2023