पदवीधारकांना इंटर्नशिप अनिवार्य- UGC चा निर्णय

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे केला जाणार आहे. यामुळे पुस्तकी शिक्षणाला प्रात्यक्षिकाचीही जोड मिळणार आहे. यासंदर्भातच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पदवीधारकांना इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विविध विषयांतील पदवीधारकाला गुणवान आणि रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)हा निर्णय घेतला आहे. ही इंटर्नशिप थेट, डिजिटल आणि हायब्रीड स्वरूपात असणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू केला जाऊ शकतो.
विविध विषयांतील पदवीधारकाला गुणवान आणि रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)हा निर्णय घेतला आहे. ही इंटर्नशिप थेट, डिजिटल आणि हायब्रीड स्वरूपात असणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू केला जाऊ शकतो. इंटर्नशिप चौथ्या सेमिस्टरनंतर कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 120 तासांची असेल. या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्याचा कार्यानुभव आणि संशोधन या कामांचा समावेश असेल.
इंटर्नशिप करणार्या विद्यार्थ्यासाठी दोन ते चार विविध क्रेडिट मिळतील. यातील एका क्रेडिटमध्ये विद्यार्थ्याला 30 तास काम अथवा संशोधन करावे लागणार आहे. हे काम 15 आठवड्यांच्या एक सेमिस्टर दरम्यान दर आठवड्याला दोन तास करावे लागणार आहे. तर चार वर्षीय पदवी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याला 8 सेमिस्टरमध्ये म्हणजेच चौथ्या वर्षाच्या अखेरच्या सहा महिने इंटर्नशिप करावी लागेल. यानिर्णयानुसार, यामध्ये अभ्यासक्रमाचे स्वरुप हे नवीन असेल. यासह यात क्रेडिट फ्रेमवर्क कार्यक्रमाचाही समावेश असेल असे, यूजीसीचे चेअरमन प्रा. एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.
या निर्णयानुसार, विद्यार्थी मार्गदर्शक आणि विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्ररीत्या इंटर्नशिप देखील करू शकतील. यासह विषयांनुसार सरकारी, कंपन्या, स्टार्टअप, खासगी संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि कृषी संबंधित विविध संस्थांत विद्यार्थी इंटर्नशिप करू शकतात.
यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना डिजिटल पोर्टल तयार करावे लागणार आहे. या पोर्टलवर तज्ज्ञ, संस्था, उद्योग, मेंटर आणि तज्ज्ञ प्राध्यापक नोंदणी करून आपल्या प्रकल्पाची माहिती शेअर करू शकतील.
SL/KA/SL
24 Oct. 2023