आंतरराष्ट्रीय महिला दिन : स्त्री स्वयंभू आहे, तेव्हा माणूस म्हणून आपली आवृत्ती अधिकाधिक समृद्ध करा.
राधिका अघोर
सालाबादप्रमाणे यंदाही आज म्हणजेच ८ मार्च ला महिला दिन साजरा होतो आहे. अलीकडे हाही दिन आठ – पंधरा दिन साजरा केला जातो. वेगवेगळे कार्यक्रम होतात, महिलांसाठी खूप ऑफर्स दिल्या जातात, महिलांचे कार्यक्रम होतात, आणखी बरंच काय काय. सगळं छान आहे, साहजिकही आहे. जगाच्या 800 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येपैकी अर्धी, म्हणजे 400 कोटी लोकसंख्या महिलांची आहे. त्यांचा सन्मान करणारा, त्यांची दखल घेणारा हा दिवस एक मोठा उत्सव म्हणूनच साजरा होतो.
मग महिला सक्षम झाल्या आहेत का? अमुक तमुक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कशा प्रवास करत आहेत? कुठल्या तरी वेगळ्या, पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांनी कसं आपलं स्थान बनवलं आहे, वगैरे चर्चा होतात. आणि गंमत म्हणजे त्याचा मापदंड असतो तो पुरुष किंवा त्याचं कार्यक्षेत्र. म्हणजे कोण किती गोरं ? तर पुलं च्या भाषेत, ” यमीपेक्षा सहा पट” … सारखं पुरुषाच्या क्षेत्रात, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वगैरे.. ही सगळी पुरुषाची क्षेत्रे आहेत, हे ठरवलं कोणी ? तर पुरुषांनीच ! आणि आपण ते मान्य करत, तिथंपर्यंत स्त्रिया कशा पोचल्या, याची कवतिके करुन धन्य होतो ! हरकत नाही, यातही कोणाचा सन्मान, कौतुक होत असेल तर आनंदच आहे, पण तो पुरेसा नाही.
तर कुठे स्त्री कशी आदर्श पत्नी, माता, देवी पासून तर अष्टावधानी म्हणजे आजच्या भाषेत मल्टी टास्किंग करणारी वगैरे आहे, ती आहे म्हणून जग चालतं. स्त्री म्हणजे समर्पण, याचे कोणी कौतुक करत, तिला देवीचा वगैरे उच्च दर्जा देतात, आणि असं करत स्वतःची केवळ झीज करुन घेऊ नकोस, एक दिवस स्वतःलाही वेळ दे.
Dear Women, for heaven’s sake, take a break!
असं आवाहन केलं जातं.
ह्या सगळ्याचा, म्हणजे आदर्श वागण्याचा उबग येऊन, (म्हणजे आधीच्या पिढीतली स्त्री, जे काही समर्पित जीवन जगली होती, ते पाहून) असं आम्हाला जगायचं नाही, आम्ही पण पुरुषांसारख्याच बिनधास्त जगणार, ते सिगारेट, दारू पितात म्हणून मग आम्हीही पिणार, मस्ती करणार, पार्टी करणार, असा एक प्रवाह आजच्या दिवशी विशेष जाणवतो. तू मुक्त हो, तुला हवं तसं जग, अमुक बंधने तोडून टाक, वगैरे छापाचे मेसेजेस फिरतात. यातही, पुन्हा मस्ती मजा, करण्यासाठी बघायचं कोणाकडे? तर पुरुषांकडेच ! त्यांच्यासारख्या भारी पार्ट्या आम्हीही करणार.. हीच आपल्या मुक्त असण्याची संकल्पना! कोणी लादली ही बंधने? आज एकविसाव्या शतकात किती मुलींवर, बायकांवर अमुकच वागावे, अशी बंधनं असतात? इच्छा असूनही त्यांना काही करता येत नाही? आणि आपली जी काही नेमून दिलेली कामे आहेत, ती करणे ह्यात स्त्री -पुरुष आले कुठे? ती तर सगळ्यांनाच करावी लागतात. जर पुरुष करत नसतील, तर त्यांना ती करायला सांगणे, हे काम बाई केव्हाही करू शकते.
सगळीकडे स्त्रियांची स्थिती खूप चांगली आहे, त्यांच्यावर त्या स्त्री आहेत म्हणून अन्याय, अत्याचार होतच नाही, असं मी म्हणणार नाही.. जे अस्थिर, युद्धग्रस्त, तणावपूर्ण भाग आहेत, तिथे दुर्बल घटक म्हणून स्त्रिया अन्यायाला बळी पडतात, त्यांना अधिक संकटे भोगावी लागतात. स्त्री असल्याचे शारीरिक मानसिक अत्याचार सहन करावे लागतात, आणि आजही जगात ही परिस्थिती अशा अशांत, मागास समाजात आहे, हे ही खरं आहे. त्याची कारणे वेगवेगळी असतील, पण ही परिस्थिती, अशा आव्हानात्मक प्रदेशातच आहेत, सार्वत्रिक नाही, हे ही तितकंच खरं आहे. अशा भागातला केवळ स्त्री वरचा नाही, तर सगळाच अन्याय दूर व्हायला हवा आहे, यात दुमत नाही.
पण जिथे आज जग प्रगती करतं आहे, एक ठिकठाक का होईना, व्यवस्था लागली आहे, अशा सगळ्या ठिकाणी बायकांची परिस्थिती एवढी वाईट नाही. त्यांना आज सगळी दारे उघडी आहेत. गरीब, सर्वसामान्य घरातल्या मुलांना जेवढा संघर्ष करावा लागतो, तेवढाच, त्यांनाही करावा लागतो. कदाचित थोडा फार जास्त असेल, पण संघर्ष केला, चिकाटी ठेवली, तर आपल्याला हवं ते मिळवण्याची मुभा महिलांना आहे, संधी आहेत.
फक्त भान एवढंच ठेवायचं आहे, की स्त्री आणि पुरुष हे माणसाचे दोन भिन्न पण एकाच पातळीचे घटक आहेत. यात कोणी कमी कोणी जास्त, असं नाही, तसंच, पुरुष, त्याची प्रगती, हे मापदंड ही चुकीचे आहेत. तेव्हा तुलना न करता, आणि पुरुषाला संपूर्ण समर्पण न करता स्वतःचा विकास साधायचा आहे.
पुरुषासारखं व्हायचं नाही, तर स्त्री म्हणूनच स्वतःला अधिकाधिक उन्नत करायचं आहे. माणूस म्हणून आपण अधिकाधिक प्रगल्भ कसे होऊ, ह्याचा प्रयत्न करायचा आहे.
निसर्गानं आपल्याला सृजनाची जबाबदारी देऊन, आधीच पुरुषापेक्षा मोठं केलं आहे, तेव्हा त्याच्या बरोबरीत येणं म्हणजे एक पायरी खाली येणं याची जाणीव ज्या दिवशी समस्त स्त्री वर्गाला होईल, तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन ठरेल !
सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!