आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : मातृभाषा आपली ओळख, ती टिकली तर आपला समाज टिकेल.

 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : मातृभाषा आपली ओळख, ती टिकली तर आपला समाज टिकेल.

राधिका अघोर

भाषेचा उगम संवादाचे, संभाषणाचे माध्यम म्हणून झाला. आणि मानव संस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतसा भाषेचा वापर आणि पर्यायाने तिचा ही विकास होत गेला. विशिष्ट समुदायाची अमुक भाषा, तिथल्या भौगोलिक रचना, संस्कृती, इतिहास यानुसार ठरत गेली, आणि मग तीच त्या त्या समुदायाची मातृभाषा ठरली. समुदायाच्या संस्कृती – परंपराशी जोडली गेली असल्याने साहाजिकच ही भाषा ही त्यांची ओळख ठरते. आपल्या आईकडून, म्हणजेच कुटुंबाकडून येणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा ठरते.आपण जन्मापासून त्या भाषेत बोलायला, वाचायला, लिहायला शिकतो. तिच्याबद्दल आपल्या मनात ममत्व, प्रेम असतं.

ह्या मातृभाषेचा सन्मान करण्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे, दरवर्षी 21 जानेवारीला साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. जगाच्या विविध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या युनेस्को ह्या जागतिक संस्थेने नोव्हेंबर 1999 साली हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. हाच दिवस निवडण्यामागे एक महत्वाचा इतिहास आहे.
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी होऊन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मात्र पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश, पाकिस्तानच्या दडपशाही विरोधात अस्मितेचा हुंकार देत होता. उर्दू हीच भाषा सगळीकडे बोलली जाईल, तीच अधिकृत भाषा असेल असा फतवा काढणाऱ्या पाकिस्तानी सरकार विरोधात, ढाका विद्यापीठाची युवा शक्ती एकवटली. बांगला ही आमची मातृभाषा आहे, आणि तीच आमची शिक्षणाची भाषा ही हवीच, याचा आग्रह धरत, बांगला भाषेसाठी या युवकांनी आंदोलन केलं. 21 फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला आणि त्यात चार तरुण हुतात्मा झाले. आपल्या मातृभाषेसाठी जीवाचं बलिदान देण्याची मानवी इतिहासातील ही दुर्मिळ घटना आहे. या बलिदानाचे स्मरण म्हणून, भाषेबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला.

भाषा ही जर केवळ संभाषणाचे साधन असेल, तर तिच्याबद्दल प्रेम आत्मियता का असायला हवी? कारण भाषा आपली, आपल्या परंपरांची, अस्तित्वाची ओळख असते. त्या त्या समुदायातील परंपरांना विशिष्ट शब्द, त्या भाषेतच असतात. त्या भाषेचा आपला गोडवा असतो, तिला जिवंतपणा असतो. त्यामुळे, जेव्हा एखादी भाषा अस्तंगत होते, त्यावेळी, तिच्यासोबत एक संस्कृतीही लयाला जाण्याचा धोका असतो. भाषेमुळे जगातले विविध रंग टिकून आहेत.

युनेस्कोच्या आकडेवारीनुसार, जगात 8,324 भाषा आहेत, त्यापैकी अनेक भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्या बोलल्याच जात नाहीत. ह्या भाषा टिकवण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे, त्यांचा वापर करणे. घरात, कुटुंबात मातृभाषेतूनच बोलण्याचा आग्रह करणे, भाषेत लिखाण करणे, आणि शक्य झाल्यास व्यवहारात, व्यवसायात तिचा जास्तीत जास्त उपयोग करणे. शुद्ध आणि चांगली भाषा बोलणे, याचा आग्रह धरला पाहिजे. अनेकदा, भाषा व्यवसायाचे साधन नसेल तर तिचा वापर होत नाही, असा युक्तिवाद केला जातो. व्यवसायाचे साधन आज अनेक ठिकाणी इंग्रजी आहे, हे मान्य, पण तुमचा व्यवसाय म्हणजेच तुमचं आयुष्य असतं असं नाही, आपल्या घरात मातृभाषेत, मराठीत बोलतांना जी सहजता असते, ती इंग्रजीतून बोलतांना येत नाही. इंग्रजी वाघिणीचे दूध असली, तरीही मातृभाषा आईचे दूध आहे, हे विसरू नये.

यंदा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचवेळी, आजपासूनच राजधानी दिल्लीत 98 वे साहित्य संमेलन ही होत आहे. साहित्य संमेलनातून तीन दिवस का होईना, भाषेचा जागर आणि उत्सव साजरा केला जातो. साहित्यिक परिसंवाद होतात, भाषेचे स्थान नेमके कुठे आहे, तिच्या समृद्धीसाठी आणखी काय करायला हवे, यावर चर्चा होते.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारी हे पहिलेच संमेलन असल्याने, त्याला विशेष महत्त्व आहे. ह्या संमेलनातून भाषेला आणि संपन्नता येईलच; पण भाषेचा सन्मान करण्याची वृत्ती जेव्हा आपल्यात नैसर्गिक रित्या येईल, त्यावेळी आपली भाषा खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि समृद्ध होईल.

आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *