राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा
मुंबई दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वासाधारण चर्चेवेळी वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टावार म्हणाले की, अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारी पैशातून मतं मिळविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही सरकारची युक्ती आहे. राज्यात दु:शासनाच्या औलादी मोकाट फिरतायत. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांना साड्यांऐवजी सरकारने शस्र वाटावीत. किमान त्या स्वत:चे संरक्षण करतील. कारण सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस पत्नींचा जाहीर अपमान करतात वर आमचा बाप सागर बंगल्यात बसलाय आमच कोणी वाकड करू शकणार नाही. अशी भाषा वापरतात. हा महिलांचा सन्मान आहे का असा सवाल वडेट्टावार यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले की, अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रीलीयन डॉलर करणार आहे. एक ट्रीलीयन डॉलर शब्द म्हणजे फुगवलेला आकडा आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचे असेल तर महसूल आणणार कुठून. कारण राज्यात उद्योग राहिले नाहीत. तज्ज्ञांचा अहवाल झोप उडवणारा आहे. तरी तुम्ही ट्रीलीयनची भाषा करता. तुमचा हा आकड्यांचा खेळ राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. राज्यात कोणी गुंतवणूक करत नाही. रोजगार नाही, उत्पादन नाही. राज्याची पूर्ण पिछेहाट झाली आहे. मागच्या बजेटमध्ये खूप घोषणा केल्या. या घोषणांच्या अंमलबजाणीसंदर्भात आम्ही 56 पत्रे दिली. परंतु फक्त एकाच सचिवांनी उत्तर दिलं. मागच्या घोषणांची कुठेही अंमलबजावणी नाही. केवळ पोकळ घोषणा करून तुम्ही करून शिळ्या कढीला ऊत आणला आहे.
अर्थसंकल्पात स्मारकाच्या घोषणा केल्या. एवढ्या सगळ्या स्मारकांना पैसा दिला. पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काय केले याचा उल्लेख केला नाही. या दोन्ही स्मारकाकडे तुमचे अक्षम्य दुर्लक्ष आहेच. पण पुणे येथील महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली हे तुम्ही सांगितले पाहिजे. पायभूत सुविधांचे प्रकल्प उभारताना मर्जीतल्या कंपन्यांना कामे दिली जातात. प्रकल्पाच्या किंमती फुगवल्या जातात. चौकशीचा ससेमिरा अधिकाऱ्यांच्या मागे लावून हवी तशी कामे करून घेतली जातात. या कामांमुळे सरकारी तिजोरीवर किती बोजा येणार याचा उल्लेख तुम्ही का करत नाही, असेही वडेट्टीवार यांनी सुनावले.
दाओसमध्ये 3 लाख कोटींचे करार केले. मात्र गेल्या वर्षी दाओसमध्ये केलेल्या करारांचे काय झाले. गुंतवणुक कुठे गेली. रोजगार निर्मिती झाली कि नाही. किती लोकांना रोजगार मिळाला. याची आकडेवारी सादर करा. मग वस्तुस्थिती समोर येईल. 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 20 हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 विशाल प्रकल्पांना प्रणेता उद्योगाचा दर्जा दिला. पण तुमच्या सत्तेच्या गेल्या दहा वर्षात 2 लाख रोजगार देखील निर्माण झाले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आमचा उद्योग आणि विकासाला पाठींबा आहेच. पण प्रणेता उद्योगाचे धोरण सांगताना नवीन किती उद्योग आले. उद्योगाचे किती नवीन पार्क तयार झाले हे तुम्ही सांगितले पाहिजे. केवळ सिलेक्टीव्ह उद्योजकांना रेड कार्पेट टाकायचे. कोणतेही नियोजन करायचे नाही. असले तुमचे धोरण म्हणजे नियोजनशून्य कारभाराचे प्रदर्शन असल्याचे वडेट्टावार यांनी सांगितले.
ML/KA/SL
29 Feb. 2024