किसान क्रेडिट कार्डवर मिळणार लाखो रुपयांचे बिनव्याजी कर्ज

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किसान क्रेडीट कार्ड हे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळण्याचा हक्काचा आधार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात येते. परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे. यावर केंद्राकडून नविन कल्पना काढल्याने होणारे अडथळे आता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. अॅग्री स्टॅक या अॅपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे. ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मे पासून राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून ई- पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अॅप विकसित करण्यात आले आहे. याच अॅपच्या धर्तीवर केंद्राकडून संपूर्ण देशासाठी एकाच अॅपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.आगामी खरीप हंगामापासून देशभरात एकाच अॅपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची बिनचूक नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अॅप डाऊनलोड आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपीतून पडताळणी होईल.
फेस आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटविण्यात येईल. शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल. एक ऑफर स्वीकारून दहा मिनिटांत प्रक्रिया करून कर्ज जमा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजारपर्यंतच्या कर्जाला कोणतेही तारण लागत नाही.
SL/KA/SL
9 March 2024