आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना मिळणार सुरक्षागृह

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत १३ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात काल शासनाने सुधारणा केली.या सुधारित परिपत्रकानुसार अशा जोडप्यांना सुरक्षा देण्याबाबत करण्यात येणार्या उपाय योजना स्पष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. या कक्षाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, त्या कक्षातील सदस्यांची नावे ही सर्व अद्ययावत माहिती जिल्हानिहाय पोलिस महासंचालक तसेच संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलिस आयुक्त यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा जोडप्याला काही काळासाठी सुरक्षित राहण्याची व्यवस्था व्हावी याकरिता आता सुरक्षागृहे उभारण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी एक कक्ष आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही कारणास्तव याठिकाणी कक्ष उपलब्ध न झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी रिक्त शासकीय निवासस्थान याकरिता दिले जाणार आहेत.
ML/ML/SL
17 Dec. 2024