छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनास सुरवात

छ. संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. दरवर्षी या साहित्य संमेलनाला समांतर असे विद्रोही साहित्य संमेलन याच याच कालावधीत भरवण्याची पद्धत गेली १८ वर्षांपासून सुरु आहे. याच धर्तीवर दिल्लीत साहित्य संमेलन सुरु झाल्यावर लगेचच छ. संभाजीनगर येथे १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. डॉ. अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली १९ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन शहरात आमखास मैदानावरील मलिकअंबर नगरीत २१ ते २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. यात परिसंवाद, कविसंमेलने, व्याख्यान, गटचर्चा यांची रेलचेल असलेल्या संमेलनात दहा हजारांपेक्षा अधिक रसिक सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. काल सायंकाळी सात वाजता ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाला सुरुवात झाली.
आज सकाळी १० वाजता औरंगपुरा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांस्कृतिक विचारयात्रा निघाली. सकाळी दहा वाजता हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते संविधान मंचावर संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक राणा, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, उर्दू साहित्यिक नुरुल हस्नैन, स्वागताध्यक्ष सतीश चकोर, मुख्य निमंत्रक धनंजय बोरडे आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रविवार, २३ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ९ ते ११ या वेळेत विविध सामाजिक विषयांवर गटचर्चा होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार होतील. दुपारी १२ वाजता ‘अंधकारमय काळात नवे विषय नवी आव्हाने, नवे लेखन’ या विषयावर शाहू पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. प्रा. वृषाली रणधीर यांचा ‘मी सावित्री जोतीराव फुले बोलतेय’ हा एकपात्री कार्यक्रम सादर होईल. दुपारी ‘संविधान आणि लोकशाहीला कॉर्पोरेट मनुवाद्यांचे आव्हान’ या विषयावर निरंजन टकले यांचे विशेष व्याख्यान होईल.
त्यानंतर ‘ए बिस्मिल्ला’ एकांकिका सादर होईल. सायंकाळी पाच वाजता ‘इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध सत्य इतिहास कथन व लेखन’ परिसंवाद होईल. यात संध्या नरे-पवार, वैशाली डोळस, डॉ. सुभाष बागल व चंद्रकांत झटाले सहभागी होणार आहेत. सायंकाळी कविसंमेलन, गझल संमेलन होईल. रात्री ८ वाजता इतिहास अभ्यासक चंद्रशेखर शिखरे, अभिनेता योगेश शिरसाट, साहित्यिक अस्लम मिर्झा, डॉ. भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत ठराव वाचनाने संमेलनाचा समारोप होणार आहे.
SL/ML/SL
22 Feb. 2025