डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशी करा

मुंबई, दि 28
मिठी नदी सफाई आणि नालेसफाईच्या कामात तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया यांची चौकशी सुरू असून, डिनो मोरिया आणि युवानेते आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असल्याने आदित्य ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.
संजय निरुपम म्हणाले, “मिठी नदीच्या सफाईसाठी गेल्या २० वर्षांत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, तरीसुद्धा ही नदी आजही पूर्णपणे स्वच्छ झालेली नाही. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, राज्य सरकारने याबाबत विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या घोटाळ्यात पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल व दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. २००५ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेत उबाठा गटाचे वर्चस्व होते आणि त्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कोणालाही कंत्राट मिळत नसे, हे सर्वश्रुत आहे.”
डिनो मोरियावर आरोप करताना निरुपम म्हणाले की, “तो फक्त या प्रकरणात सहभागी नाही, तर मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही त्याचे नाव चर्चेत आहे. तसेच, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.”
मुंबईतील अतिवृष्टी आणि ठाकरे कुटुंबावर टीका
संजय निरुपम यांनी २००५ च्या अतिवृष्टीची आठवण करून देत ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. “२६ जुलै २००५ रोजी मुंबईला मोठा पूर आला होता, मात्र त्या वेळी ठाकरे कुटुंब रस्त्यावर दिसले नाही. बाळासाहेब मातोश्रीवर होते आणि उद्धव ठाकरे कुटुंबासह ताज हॉटेलमध्ये गेले होते,” असा आरोप त्यांनी केला.
त्याच्या उलट, सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला, आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज राहिले, असे निरुपम यांनी सांगितले.
संजय राऊतांवरही टीका
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावरही संजय निरुपम यांनी टीका केली. “राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत काय? जगभर भारतीय खासदार ऑपरेशन सिंदूरची गौरवगाथा सांगत असताना, राऊत मात्र पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही प्रकरणे केवळ राजकीय वाद नाहीत, तर मुंबईकरांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी योग्य आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.