गिरणी कामगार घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार ! सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर

मुंबई प्रतिनिधी: गिरणी कामगार घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागावा, यासाठी बैठक बोलाविण्यासाठी आपण पुढाकार घेणार,अशी ग्वाही राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी येथे बोलताना दिली.
गिरणी कामगारांमध्ये गेली पन्नास वर्ष कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचा सुवर्ण महोत्सव सोहळा डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने पार पडला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सहकार विभाग म्हणून कार्यरत असलेल्या संस्थेचा हा कौतुक सोहळा संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी सभागृहात पार पडला.अध्यक्षस्थानी सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते.प्रारंभी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आझाद मैदानवर जे आंदोलन छेडण्यात आले होते,त्यावर सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते.परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही. ती अंमलबजावणी त्वरित व्हावी,यासाठी सहकार,गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पुढाकार घ्यावा,असा आग्रह आज लढा समितीचे प्रमुख सचिन अहिर यांनी निवेदनाद्वारे मंत्रीमहोदयांकडे अग्रह धरला.
याप्रसंगी गिरणी कामगार घराच्या प्रश्न सोडवणुकीला प्राधान्य दिले जाईल,असे सांगून,राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आहे.तेव्हा आपल्याला सहका राकडून समृद्धीकडे जायचे आहे.आज व्यापारी असेल किंवा सामान्य ग्राहक असेल, त्यांच्या मुख्यअडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागेल.शहरापेक्षा ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना आज फार मोठ्या हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे,या गोष्टींकडे लक्ष वेधून त्यांच्या पुनर्विकासाचे काम हाती घ्यावे लागेल असेही सांगितले.राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक संघाने गेल्या पन्नास वर्षात शून्यातून विश्व निर्माण केले आहे,त्याबद्दल राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आपल्या भाषणात नेतृत्व तसेच संचालकांच्या कामाचे कौतुक केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले,सहकारी चळवळ आर्थिक सबळता, सामाजिक एकता आणि कामातील एकाग्रता या प्रामुख्याने तीन घटकावर अवलंबून असते.आज सहकार चळवळ वाढविण्यापेक्षा टिकविणे महत्त्वाचे ठरले आहे.तेव्हा सहकारी संस्थांना एकत्र येऊन आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे.
सहकारी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते म्हणाले,कामगार महर्षी स्व. गं.द.आंबेकर यांनी कामगार चळवळीचे कार्य केवळ आर्थिक मागण्या मिळविण्या पुरते सिमित ठेवले नाही.तर आरोग्य, शिक्षण, निवासा सारखे विधायक काम हाती घेऊन, कामगारांचा जीवन स्तर उंचाविला.सहकारी ग्राहक संस्था स्थापन करणे हे आंबेकरजींचे स्वप्न होते,ते सर्व नेत्यांनी पूर्णत्वास गेले आहे.आभार संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले,आपना बाजारचे अध्यक्ष अनिल गंगर, सहकारी भंडारचे अध्यक्ष संजय शेटे, सुपारीबाग मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष किशोर देसाई,सह्याद्री सेंट्रल कन्झ्युमर सोसायटीचे शांताराम कदम आदींनी आपल्या भाषणात राष्ट्रीय मजदूर ग्राहक संघाच्या कामाचे कौतुक केले.त्यावेळी सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गेल्या पन्नास वर्षांतील कार्यकर्ते,आजी,माजी संचालक,कर्मचारी यांचा शाल,स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महोत्सव सोहळा महाव्यवस्थापक विलास डांगे यांच्या कुशल सहकार्याने तर सूत्रसंचालन ग्राहक संस्थेचे खजिनदार बजरंग चव्हाण यांनी केले. उपाध्यक्ष रघुनाथ शिरर्सेकर,संचालक, निवृत्ती देसाई, मारुती शिंत्रे,सुनील बोरकर, शिवाजी काळे,बळीराम महाडिक,मनोहर पाटील, स्मिता शिंदे,सुनिता खराटे अदी संचालकांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.