ठाण्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव
ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूची लागण सुरु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एव्हियन इन्फ्ल्यूएंजा कंट्रोल मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्षांच्या ठिकाणापासून एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच चिकन व अंडी विक्री दुकाने जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेली आहेत. तसेच मांस विक्रेते करणाऱ्यांना स्वच्छता बाळगण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलले आहे. दरम्यान, बर्ड फ्लू आजाराने कोपरी परीसरातही शिकराव केल्याने मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे.
बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग, कोंडवाडा विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागमधील कर्मचाऱ्यांचे भरारी पथक तयार करण्यात आले आहेत.
SL/ML/SL
23 Jan. 2025