धारावी पुनर्विकास योजनेत अपात्र लोकांनाही सामावून घेतले जाणार
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेत सध्या अपात्र ठरविण्यात आलेल्या रहिवाशांना पुन्हा पात्र करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल आणि त्यातूनही जे अपात्र ठरतील त्यांना भाड्याची घरे दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती , सध्या या योजनेबद्दल मोठा गैरसमज आणि गोंधळ असल्याचं तसेच तो दूर करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही असं गायकवाड यांनी म्हटलं होतं.
एकूण ५९,१६५ कुटुंब तिथे पात्र झाली असून त्यांना किमान चारशे पाच फुटांची जागा मिळणार आहे, ज्यांची जागा अधिक आहे त्यांना त्यापेक्षा अधिक जागा दिली जाईल. याशिवाय तिथल्या लघू उद्योगांना तिथेच सध्याच्या जागेपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देऊन त्यांना पाच वर्षांसाठी जिएसटी माफी दिली जाणार आहे असं ही फडणीसांनी सांगितलं.
नवीन विकसित इमारती मधील रहिवाशांना देखभाल दुरुस्ती रक्कम द्यावी लागू नये यासाठी प्रयत्न केला जाईल, न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेपर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व धार्मिक स्थळांची नव्याने बांधून दिली जातील , लोकप्रतिनिधी आणि इतरांसाठी स्थानिक पातळीवर संपर्क यंत्रणा उभारली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
ML./KA/SL
30 Dec. 2022