ISI अस्तित्वात असेपर्यंत भारत-पाकिस्तान संघर्ष अटळ – अरविंद व्यं. गोखले

 ISI अस्तित्वात असेपर्यंत भारत-पाकिस्तान संघर्ष अटळ – अरविंद व्यं. गोखले

मुंबई, दि 29

तळेगाव दाभाडे प्रतिनिधी पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) या संस्थेचा पायाच भारत द्वेषाचा आहे. त्यामुळे ही संस्था अस्तित्वात असेपर्यंत भारत व पाकिस्तानमधील संघर्ष संपणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार व पाकिस्तानविषयक अभ्यासक अरविंद व्यं. गोखले यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आणि श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथे आयोजित “संघर्ष पाकिस्तानशी” या विषयावरील विशेष व्याख्यानात अरविंद गोखले यांनी भारत-पाकिस्तान संबंधांच्या गुंतागुंतीच्या पैलूंवर सखोल प्रकाश टाकला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार तसेच संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी उपस्थित होते.  

गोखले म्हणाले की, पाकिस्तानचा आर्थिक कणा हा अवैध ड्रग्ज व्यापारावर आधारित असून त्यातून मिळणारा काळा पैसा दहशतवाद पोसण्यासाठी वापरला जातो. यामुळे पाकिस्तान हा दहशतवादी कारवायांचा अड्डा ठरत असून, ISI ही संस्था यामागे सक्रिय आहे. जगातील कोणत्याही देशात लष्कराच्या मालकीचे मॉल नाहीत, पण पाकिस्तानात लष्कराच्या मालकीचे मॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, याकडेही गोखले यांनी लक्ष वेधले.

भारताने अलीकडच्या काळात आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण परराष्ट्र धोरण स्वीकारले आहे. कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्याची वृत्ती सोडून आता भारत ‘जशास तसे’ उत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानला बचावात्मक भूमिकेत यावे लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोखले यांनी अमेरिका- पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना सांगितले की, अमेरिका केवळ स्वार्थासाठी पाकिस्तानला मदत करते, मात्र आता भारत कोणाच्याही दबावात राहत नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवणे ही पाकिस्तानची गरज होती, कारण त्याचे अण्वस्त्र साठे धोक्यात आले होते.

त्यांनी यावेळी पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थितीवरही भाष्य केले. पाकिस्तानातील ४०% सुशिक्षित नागरिक भारताशी संघर्षास विरोध करत असले तरी लष्कर, ISI आणि मदरशांमधून भारतविरोधी प्रशिक्षण दिले जात असल्याने संबंधांमध्ये सुधारणा होणे अशक्यप्राय आहे.

भारताचे विद्यमान नेतृत्व आणि परराष्ट्र धोरण याचे गोखले यांनी जोरदार समर्थन करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे पाकिस्तानला जागतिक पातळीवर कुठूनही समर्थन मिळाले नाही. भारताने ऑपरेशन थांबवून पाकिस्तानला संधी दिली, मात्र पाकिस्तानचा मुजोरपणा जगासमोर उघड झाला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पातळीवर पाकिस्तानविरोधी निर्णय घेणे सोपे झाले आहे.

पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, मात्र प्रत्यक्षात ते वेगळे होणार अशी शक्यता फारशी नाही, असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी राजवटीचे भाकीत

पाकिस्तानमध्ये लष्करशहांनी अनेकदा सत्ता हस्तगत केली असून, सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पदच्युत होऊन लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सत्ता हातात घेतली तरी आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नसेल, असे भाकीतही गोखले यांनी केले.

पाकिस्तानशी संघर्ष यापुढेही सुरूच राहणार असल्यामुळे पाकिस्तानमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या व्याख्यानाचे आयोजन तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाने केले होते. कार्यक्रमाची सुरुवात यशस्वी विद्यार्थी नामफलकाच्या अनावरणाने झाली. या फलकावर गेल्या दशकभरात अभ्यासिकेतील ५१ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे.

प्रमुख पाहुणे विवेक इनामदार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टिकोन या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सागर शहा यांनी, पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष हर्षल गुजर यांनी  करून दिला. सूत्रसंचालन पद्मनाभ पुराणिक यांनी केले. इयत्ता दहावीत ९५ टक्के गुण मिळणारा यशस्वी विद्यार्थी श्रवण बेल्हेकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी जय कुमार साहू आणि दिलीप कसबे यांनी आपले अनुभव शेअर करत अभ्यासिकेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अरविंद गोखले यांनी चरित्रकोशाचे खंड वाचनालयास भेट दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी संध्या गाडे यांनी आभार प्रदर्शन केले. मीनल कुलकर्णी  यांनी सादर केलेल्या अखंड वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चिटणीस प्रीतम भेगडे, खजिनदार यतीन शहा, तसेच संचालक रामचंद्र रानडे, प्रशांत दिवेकर, ललित गोरे, अक्षय अभ्यंकर, अविनाश राऊत, महेंद्र जैन, विक्रम दाभाडे, हीना दोशी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास वाचक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *