भारताच्या लक्ष्यने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद

 भारताच्या लक्ष्यने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद

सिडनी, दि. २४ : भारताचा २४ वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने काल ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद काबिज केले. लक्ष्यचे हे २०२५ या वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले. ५०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सातव्या मानांकित लक्ष्यने भारताच्याच आयुष शेट्टीवर २३-२१, २१-११ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली होती. मग शनिवारी उपांत्य सामन्यात लक्ष्यने चायनीज तैपईच्या चो टिन चेनला १७-२१, २४-१२, २१-१६ असे ३ गेममध्ये पराभूत केले. रविवारी अंतिम फेरीत लक्ष्यने जपानच्या युशी टनाकाला २१-१५, २१-११ अशी धूळ चारली. लक्ष्यने अवघ्या ३८ मिनिटांत ही लढत जिंकून जेतेपद मिळवले.

लक्ष्यने यंदाच्या वर्षात फक्त दुसऱ्‍या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. हाँगकाँग ओपन स्पर्धेत लक्ष्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आयुषच्या रूपात फक्त एकमेव भारतीयाने २०२५ या वर्षात स्पर्धा जिंकलेली होती. आयुषने काही महिन्यांपूर्वी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. त्यामुळे लक्ष्यवर सर्वांच्या नजरा होत्या. लक्ष्यने अखेरीस जेतेपद मिळवून दाखवले. त्यामुळे वर्षभरात भारतासाठी वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला.

लक्ष्यचे कारकीर्दीतील वरिष्ठ पातळीवरील नववे विजेतेपद ठरले. २०२४मध्ये लक्ष्यने सय्यद मोदी स्पर्धा जिंकली होती. २०२१च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने २०२२च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण, तर २०२२च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकही जिंकलेले आहे. तसेच २०२२च्या थॉमस चषक विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. आता यापुढे लक्ष्य कामगिरीत सातत्य राखेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, पुरुष दुहेरीत अग्रमानांकित भारतीय जोडीने मात्र निराशा केली. सात्विक-चिरागसमोर फझर अल्फियान व मोहम्मद फिकरी या इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जोडीचे आव्हान होते. मात्र सात्विक-चिरागने १९-२१, १५-२१ असा पराभव पत्करला. त्यामुळे सात्विक-चिरागची वर्षातील पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा कायम आहे. त्यांनी वर्षभरात दोन स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षात पी. व्ही. सिंधू, लक्ष्य व अन्य सर्व भारतीय खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. तसेच २०२५च्या जागतिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी निराशा केली. वर्षभरातील बहुतांश स्पर्धांमध्ये एकेरी गटात भारताचे खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतच पोहोचत होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीत प्रणाॅय, किदाम्बी श्रीकांत या खेळाडूंचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच संपुष्टात आले होते. त्यामुळे लक्ष्यवरच सर्वांच्या आशा टिकून होत्या.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *