जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला सुवर्ण पदक

जर्मनी, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बर्लिनमध्ये सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या व्ही ज्योती सुरेखा, आदिती स्वामी आणि परमित कौर या महिला त्रिकुटानं आपल्या पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घालत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यांनी संयुक्त महिला अंतिम सामन्यात प्रथम मानांकित मेक्सिकोच्या संघाचा २३५ विरुद्व २२९ असा पराभव केला. महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत प्रथमच टॉप-8 तिरंदाजांमध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे.
याआधी उपांत्य फेरीत कोलंबियाचा 220-216 असा पराभव झाला होता. तर भारतीय संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. तर उपांत्यपूर्व फेरीत तुर्की आणि उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईचा पराभव केला.
भारताच्या महिला कंपाउंड संघाने प्रथमच जागतिक तिरंदाजी स्पर्धा जिंकली आहे. तिरंदाजीच्या या स्पर्धेत भारताला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 1931 मध्ये सुरू झाली. 1931 ते 1969 पर्यंत ही स्पर्धा ही दरवर्षी आयोजित केली असे. मात्र 1969 पासून दर दोन वर्षांनी याचे आयोजन केले जाते. या चॅम्पियनशिपमध्ये भारताने 9 वेळा रौप्य पदक आणि 2 वेळा कांस्य पदक जिंकले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. त्यांची कठोर मेहनत आणि समर्पण या गुणांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी करणं शक्य झालं असून देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
SL/KA/SL
5 Aug 2023