भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला ज्युनियर आशिया कप
टोकीओ, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येणार असे चित्र सध्या दिसत आहे. भारतीय संघाने रविवारी ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. मुमताजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने फायनलमध्ये चार वेळच्या किताब विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. भारताने २-१ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
अन्नू आणि आणि नीलम यांच्या दमदार खेळीमुळे जपानच्या मैदानावर भारतीय महिला संघाच्या नावे या दमदार विजयाची नोंद झाली आहे.
यासह भारतीय संघ पहिल्यांदाच ज्युनियर आशिया कपचा विजेता ठरला आहे. भारताने फायनल गाठून पुढच्या वर्षी होणाऱ्या एफआयएचच्या विश्वचषकातील आपला प्रवेश निश्चित केला. अन्नू, नीलमची कामगिरी कौतुकास्पद : भारतीय संघाच्या रोमहर्षक विजयासाठी अन्नू आणि नीलमची कामगिरी कौतुकास्पद ठरली. अन्नूने संघाला २१ व्या मिनिटाला गोलचे खाते उघडून दिले. यामुळे भारताने सामन्यात आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन मिनिटात कोरियाने सामन्यात बरोबरी साधली. पार्कने २४ व्या मिनिटाला कोरियासाठी गोल केला. त्यानंतर १६ मिनिटांपर्यंत हा सामना बरोबरीत राहिला. नीलमने सामन्याला कलाटणी दिली. तिने ४० व्या मिनिटाला गोल करून भारताचा विजय निश्चित केला.
जपानमध्ये आयोजित आशिया कप स्पर्धेतून तीन संघांना वर्ल्डकपचा प्रवेश निश्चित करण्याची संधी हाेती. यासाठी चॅम्पियन भारतासह उपविजेता दक्षिण कोरिया आणि कांस्यपदक विजेता जपान संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील टॉप-३ संघांना आता थेट वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळाला आहे. यादरम्यान जपान संघाने घरच्या मैदानावर सरस खेळी करत कांस्यपदकाच्या लढतीत चीनचा पराभव केला. जपान संघाने २-१ ने सामना जिंकला.
SL/KA/SL
12 June 2023