विक्रमी धावसंख्येसह भारतीय महिला क्रिकेट संघाचा आयर्लंडवर ऐतिहासिक विजय
राजकोट, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघाने आयर्लंडविरूद्ध मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४३५ धावा ऐतिहासिक धावसंख्या उभारली. सर्वात मोठ्या वनडे धावसंख्येनंतर भारताने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या महिला संघाने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
भारतीय संघाने आयर्लंड संघावर ३०४ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. भारतीय संघाच्या वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५ धावा केल्या. महिला एकदिवसीय सामन्यात ४०० धावांचा टप्पा पार करणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ आहे. टीम इंडियाने मागील सामन्यातही ३७० धावसंख्या उभारली आहे. यादरम्यान सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी शतकी खेळी केल्या. त्याचवेळी यष्टीरक्षक ऋचा घोषनेही झटपट अर्धशतक झळकावले.
४३६ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाची सुरूवात खूपच खराब झाली. आयर्लंडचा संघ केवळ ३१.४ षटकेच खेळू शकला आणि १३१ धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान एकाही आयरिश फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. तर दीप्ती शर्माने टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट घेतले. तनुजा कंवर हिलाही २ विकेट मिळवण्यात यश आले. तितास साधू, सायली सातघरे, मिन्नू मणी यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
SL/ML/SL
15 Jan. 2025