भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल
दाम्बुला, श्रीलंका, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दमदार धडक मारली आहे. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे अगदी सहजसाध्य लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत ते लक्ष गाठले. सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ५५ धावा केल्या. शेफाली वर्माने २८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावांची नाबाद खेळी करत भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताने आतापर्यंत स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व सामने खेळले आहेत. सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. अंतिम फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार हे आज होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. रविवारी २८ जुलै रोजी आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे.
भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून फक्त ८० धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने ५१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. शोर्ना अख्तरने १८ चेंडूत २ चौकारांसह १९ धावा करत नाबाद परतली. भारताकडून रेणुका ठाकूर सिंग आणि राधा यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. रेणुकाने तिच्या चार षटकांत केवळ १० धावा दिल्या आणि ३ विकेट घेतल्या. तर राधाने १४ धावा देत ३ विकेट घेतले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
SL/ML/SL
26 July 2024