भारतीय महिला बॅडमिंटन संघाने जिंकली आशिया चॅम्पियनशिप

शाह आलम, मलेशिया, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने आज ऐतिहासिक कामगिरी करत आशिया टीम चॅम्पियनशिप (BATC) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप (BATC) मध्ये भारताने धमाकेदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. मलेशियातील शाह आलम येथे आज (१८ फेब्रुवारी) या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला.
विशेष म्हणजे भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी भारताला या स्पर्धेत एकही पदक मिळाले नव्हते. पीव्ही सिंधू, गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली आणि अनमोल खरब यांनी अंतिम सामन्यात आपापले सामने जिंकले. अव्वल मानांकित चीनला हरवून भारताने गटात अव्वल स्थान पटकावले होते. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिला सामना पीव्ही सिंधू आणि सुपानिडा केटेथोंग यांच्यात झाला. दुखापतीतून सावरल्यानंतर आपली पहिली स्पर्धा खेळणाऱ्या पीव्ही सिंधूने सुपानिडा केटेथोंगचा २१-१२, २१-१२ असा पराभव करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सिंधू आणि सुपनिदा यांच्यातील सामना ३९ मिनिटे चालला.
त्यानंतर दुहेरीच्या लढतीत गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा यांनी जोंगकोलफाम कितिथारकुल आणि रविंदा प्रजोंगजल यांचा २१-१६, १८-२१, २१-१६ असा पराभव करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.मात्र, या दरम्यान भारताच्या अस्मिता चालिहा हिला पराभवाचा सामना करावा लागला. अस्मिता चालिहाचा बुसानन ओंगबामरुंगफानने ११-२१, १४-२१ असा पराभव केला.त्यानंतर दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यातही भारताच्या श्रुती-प्रिया जोडीला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे स्कोअर २-२ असा बरोबरीत झाला. पण त्यानंतर अखेरच्या सामन्यात १६ वर्षीय अनमोल खराबने निर्णायक सामना जिंकून भारताला चॅम्पियन बनवले.
SL/KA/SL
18 Feb. 2024