भारतीय पोस्ट खात्याने अंटार्क्टिकामध्ये सुरु केले पोस्ट ऑफिस
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातही भारतीय पोस्टाचा वापर काहीसा कमी झाला असला तरीही अंटार्क्टिकासारख्या दुर्गम भागात अजूनही पोस्टाचे महत्त्व टिकून आहे. भारताच्या टपाल विभागाने एक नवा इतिहास रचला आहे. भारताने अंटार्क्टिकामध्ये आणखी एक नवीन पोस्ट ऑफिस सुरु केले आहे. अंटार्क्टिकामध्ये सर्वत्र बर्फ असलेल्या ठिकाणी भारताचे हे पोस्ट ऑफिस सुरु करण्यात आले आहे. ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राचा (एनसीपीओआर) २४ वा स्थापना दिवस असल्यामुळे हे पोस्ट ऑफिस सुरू करण्याची तारीख ५ एप्रिलची निवड करण्यात आली.
भारतात जवळपास एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत इंडिया पोस्टचा कारभार चालतो. यामध्ये अनेक ठिकाणी दूरवरील सेवाही इंडिया पोस्टच्या माध्यमातून दिल्या जातात. आता अंटार्क्टिकाशी संबंधित पत्रासंदर्भात भारतातील लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. तसेच भारत आणि अंटार्क्टिकामध्ये एक संशोधन मोहिम सुरु असून या संशोधन मोहिमेमध्ये भारतातील ५० ते १०० शास्त्रज्ञ अंटार्क्टिकामध्ये काम करत आहेत. हे पाहता आता अंटार्क्टिकामध्ये तिसरे पोस्ट ऑफिस उघडण्यात आले आहे.
महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल के.च्या.शर्मा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंटार्क्टिका येथील भारताच्या तिसऱ्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना के.शर्मा म्हणाले, “भारताने अंटार्क्टिका येथील दक्षिण गंगोत्री स्थानकात १९८४ मध्ये पहिले पोस्ट ऑफिस उघडले होते. त्यानंतर १९९० मध्ये मैत्री स्टेशनमध्ये दुसरे पोस्ट ऑफिस उघडण्यात आले. त्यानंतर आता अंटार्क्टिकामध्ये तिसरे पोस्ट ऑफिस उघडण्यात आले आहे.”
SL/ML/SL
6 April 2024