ट्रम्प हट्टामुळे NASA तील भारतीय वंशाच्या संशोधिकेला गमवावी लागली नोकरी

वॉशिग्टन डीसी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘अमेरिकन फर्स्ट’ चा नारा देत अनेक धडाकेबाज निर्णय घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना वेठीस धरले आहे.ट्रम्प यांच्या काही निर्णयांचा फटका आता अमेरिकेतील शिक्षण आणि संशोधन संस्थांनाही मिळत आहे. काही प्रख्यात विद्यापीठांचा निधीही ट्रम्प सरकारने अडकवून ठेवला आहे. NASA सारख्या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेलाही आता ट्रम्प यांच्या निर्णयांसमोर झुकवं लागत आहे. NASA मध्ये उच्च पदावर नियुक्त असलेल्या भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. NASA ला इच्छा नसतानाही नीला यांना नोकरीवरुन काढून टाकावे लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याच्या आदेशावर नासाने ही मोठी कारवाई केली आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने (जेपीएल) सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नीला यांना नोकरीवरुन काढल्याची माहिती दिली आहे. नीला या नासाच्या डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन (DEI) च्या प्रमुख होत्या.
डायव्हर्सिटी प्रोग्राममुळे अमेरिका वंश, रंग आणि लिंगाच्या आधारावर विभागली गेली आहे, असे ट्रम्प यांचे मत आहे. असे कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक पैशांची केवळ उधळपट्टी. यामुळे भेदभाव वाढतो. म्हणूनच ट्रम्प यांनी अमेरिकेत चालणारे सर्व डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर NASA सहित अनेक संस्थांनी आपली डायव्हर्सिटी कार्यालये पूर्णपणे बंद केली आहेत.
अमेरिकेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्व डायव्हर्सिटी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत डायव्हर्सिटी प्रोग्रामसाठी करण्यात आलेल्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या. मात्र, व्हाईट हाऊसकडून नोटीस मिळाल्यानंतरही नासाने नीलाची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पद बदलण्यात आले. मात्र, ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे आता नासाकडे नीलाला काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता.
SL/ML/SL
15 April 2025