भारतीय नौदल दिन : शं नो वरुण: स्वदेशीकरणातून नौदलाचे सामर्थ्य आणि शक्ती वाढवणे
राधिका अघोर
भारतीय नौदलाच्या पराक्रमाचे स्मरण आणि गौरव करण्यासाठी, दरवर्षी चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय सैन्यदलांनी लढलेल्या कठीण युद्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘ऑपरेशन ट्रायडंट’ मध्ये भारतीय नौदलाने अतुलनीय पराक्रम गाजवत, पाकिस्तानच्या पीएनएस खैबर या मोठ्या युद्धनौकेसह, चार युद्धनौका नष्ट करत, शेकडो पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवलं. नौदलाच्या या पराक्रमामुळेच भारताला ही युद्ध जिंकता आलं. या साहसाचे स्मरण म्हणून नौदल दिन साजरा करत, युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना अभिवादन केले जाते, तसेच विशेष कार्य करणाऱ्या जवानांचा गौरव केला जातो.
शं नो वरुण: असं नौदलाचे आदर्श वाक्य आहे. सतत समुद्रावर राहणाऱ्या नौदलावर वरुण म्हणजे जलदेवतेची कृपा कायम राहो, अशी ही प्रार्थना आहे. यंदाच्या नौदल दिनाची संकल्पना आहे, ‘ नवोन्मेष आणि स्वदेशीकरणातून नौदलाचे सामर्थ्य आणि शक्ती वाढवणे ‘ गेल्या काही वर्षात, भारताने नियोजनपूर्वक आपली ताकद वाढवण्यासाठी तसेच शस्त्रास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचा परिणाम म्हणून नौदलाचीही ताकद वाढली आहे. अत्यंत आधुनिक अशा अरिघात श्रेणीच्या विनाशक पाणबुड्या, युध्दनौका यांच्यासह मिग 29 k सारखी लढावू विमाने आज नौदलाच्या ताफ्यात आहेत.
आज ओडिशाच्या नौदल तळावर होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर नौदलाच्या ह्या सामर्थ्याचे प्रदर्शन करत मानवंदना दिली जाईल.
नौदल दिन आणि सप्ताहानिमित देशभरातल्या नौदलाच्या तळांवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. केवळ नौदल दिनच नाही, तर नौदल सप्ताह साजरा केला जातो. नौदलाबद्दल जनजागृती करणाऱ्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. नौदलाच्या युद्धनौका सर्वसामान्य नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुल्या केल्या जातात. शाळांमध्ये नौदलासंबधी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
भारतीय नौदलाला अतिशय जुना आणि समृद्ध इतिहास आहे. दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचं मोठं आरमार होतं, व्यापारी जहाजेही असत, याचे पुरावे आहेत. मात्र, त्यापेक्षाही अलिकडचा इतिहास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. देशाला असलेला ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांच्या आरमाराचा धोका त्यांनी सर्वात पहिल्यांदा ओळखला आणि त्याला तोंड देण्यासाठी, अरबी समुद्रात आपले स्वतःचे आरमार उभारले. अत्यंत आधुनिक आणि शक्तीशाली आरमार आणि जलदुर्ग बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक मानले जातात. अलीकडेच भारतीय नौदलात विक्रांत ही विराट स्वदेशी युद्धनौका समाविष्ट करण्याच्या समारंभाच्या वेळी भारतीय नौदलाचा ध्वज देखील बदलण्यात आला.
ब्रिटिशकालीन ध्वजाच्या ऐवजी शिवाजी महाराजांची राजमुद्रा चिन्हीत असलेला ध्वज, आता आपला वारसा पुढच्या पिढ्यांना मोठ्या दिमाखात सांगतो आहे.
भारतीय नौदल केवळ आपल्या पराक्रमासाठीच ओळखले जात नाही, तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, तसेच अनेक मानवतावादी मोहिमांमध्ये भारताच्या नौदलाचे मोठे योगदान आहे. कोविड काळात भारतीय नौकांनी, अनेक देशांत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करत, भारताच्या मानवतेचे दर्शन घडवले. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राच्या संरक्षणात भारतीय युद्धनौकांची भूमिका महत्वाची आहे. आज भारताचे नौदल जगातल्या सर्वाधिक अत्याधुनिक आणि शक्तीशाली नौदलांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आज नौदलाच्या ताफ्यात, सुमारे 150 जहाजे आणि पाणबुड्या असून, 67,000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
यावर्षी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय नौदलाची जहाजं, पाणबुड्या, विमानं तसंच नौदलाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण विभागीय नौदल कमांडमधली विशेष दले विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे आणि विविधांगी पैलूंचे दर्शन घडवतील. सूर्यास्त सोहळा आणि नांगर टाकलेल्या जहाजावरच्या रोषणाईने या कार्यक्रमाची सांगता होईल.
नौदलाविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक माहिती पोहचवणं, नौदलाच्या बाबतीत नागरींकांमध्ये अधिक सजगता निर्माण करणं, आणि राष्ट्रीय सुरक्षेत भारताचं नौदल देत असलेलं योगदान सर्वांसमोर मांडणं हे नौदल दिन साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आहे.