#चालु आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 25 टक्क्यांनी घसरू शकते- अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार

 #चालु आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 25 टक्क्यांनी घसरू शकते- अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार

नवी दिल्ली, दि.18(एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारच्या दाव्यांच्या विरुद्ध अर्थव्यवस्थेत अधिक गतीने सुधारणा होत नसल्याचे मत देशातील सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार यांनी व्यक्त केले आहे. कुमार यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये 25 टक्क्यांची घसरण होऊ शकते. कुमार म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अर्थसंकल्पीय अंदाज पूर्णपणे आवाक्याबाहेर गेला असून अर्थसंकल्पात सुधारणा करण्याची गरज आहे.
कुमार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सरकार जसे दाखवत आहे त्याप्रमाणे देशाच्या आर्थिक वाढीमध्ये तितकी गती आलेली नाही. असंघटित क्षेत्रातील परिस्थिती सुधारलेली नाही आणि सेवा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या भागांनीदेखील प्रगती केलेली नाही. त्यांनी सांगितले की, माझ्या विश्लेषणानुसार, चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 25 टक्क्यांची घसरण होईल. एप्रिल – मे मध्ये टाळेबंदीच्या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन झाले. इतकेच काय कृषी क्षेत्रातही वाढ झाली नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा (आरबीआय) अंदाज आहे की चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांनी घसरेल. त्याचबरोबर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) अर्थव्यवस्थेत 7.7 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे माजी प्राध्यापक कुमार म्हणाले की, सरकारने एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर या तिमाहींसाठीची जी कागदपत्रे उपलब्ध केली आहेत, त्यातही या आकडेवारीत नंतर सुधारणा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, भारताची वित्तीय तूट मागील वर्षाच्या तुलनेत जास्त असेल.
राज्यांची वित्तीय तूटही जास्त राहील. ते म्हणाले की निर्गुंतवणुकीचा महसुलही कमी असेल. कर आणि बिगर-कर महसुलातही घट येईल. कुमार यांनी सांगितले की भारताचे आर्थिक पुनरुज्जीवन अनेक घटकांवर अवलंबून असेल. लसीकरण किती वेगाने होते आणि किती वेगाने लोक त्यांच्या कामावर परत जाऊ शकतील. ते म्हणाले की आपण 2021 मध्ये 2019 च्या उत्पादन पातळीवर पोहोचू शकणार नाही. लसीकरणानंतर 2022 मध्ये आपण 2019 ची उत्पादन पातळी गाठण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, आगामी वर्षांमध्ये विकास दर खालच्या पातळीच्या आधाराच्या परिणामुळे चांगला असेल, परंतु उत्पादन 2019 च्या तुलनेत कमी असेल.
Tag-Indian Economy/This Year/Economist Arun Kumar
PL/KA/PL/18 JAN 2021

mmc

Related post