#भारतीय अर्थव्यवस्था अधिक लवचिक सिद्ध होऊ शकतेः संयुक्त राष्ट्राचा अहवाल

 #भारतीय अर्थव्यवस्था अधिक लवचिक सिद्ध होऊ शकतेः संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, कोविड-19 च्या उद्रेकानंतर दक्षिण आणि नैऋत्य आशियातील अपखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वात लवचिक असल्याचे सिद्ध होऊ शकते. कोविड-19 नंतर कमी परंतू सकारात्मक आर्थिक वाढीमुळे आणि मोठ्या बाजारपेठेमुळे गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक ठिकाण राहील असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आशिया आणि प्रशांत साठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने (युएनईएससीएपी) ने जाहीर केलेल्या ‘आशिया आणि प्रशांत मध्ये थेट परदेशी गुंतवणूकीचे कल आणि परिस्थिती 2020/2021’ या शीर्षकाच्या अहवालात सांगण्यात आले आहे की 2019 मध्ये दक्षिण आणि नैऋत्य आशियामध्ये थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ दोन टक्क्यांनी घटला आहे आणि 2018 च्या 67 अब्ज डॉलरच्या तुलनेत ती 2019 मध्ये 66 अब्ज डॉलर होती.
परंतू या काळात भारतातील थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ सर्वाधिक होता आणि या उपखंडामधील एकूण थेट परकीय गुंतवणूकीमधील त्याचा हिस्सा 77 टक्के होता. या कालावधीत भारतात थेट परकी गुंतवणूकीद्वारे 51 अब्ज डॉलर्स आले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के जास्त आहेत.
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की यापैकी बहुतांश ओघ माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) आणि बांधकाम क्षेत्रामध्ये आला. आयसीटी क्षेत्राबाबत अहवालात सांगण्यात आले आहे की बहुराष्ट्रीय उद्योग (एमईएन) माहिती तंत्रज्ञान सेवांनी युक्त स्थानिक डिजिटल पर्यावरणतंत्रामध्ये गुंतवणूक करीत आहेत आणि विशेषत: ई-कॉमर्समध्ये मोठ्याप्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक झाली आहे. अहवालात म्हटले आहे की दक्षिण आणि नैऋत्य आशियामधून थेट परकीय गुंतवणूकीचा प्रवाह सलग चौथ्या वर्षी वाढला आणि 2018 च्या 14.8 अब्ज अमेरिकन डॉलर वरून वाढून 2019 मध्ये 15.1 अब्ज अमेरिकन डॉलर झाला. या अहवालात असे म्हटले आहे की दीर्घकाळात भारताची अर्थव्यवस्था सर्वात लवचिक असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि साथी नंतर आर्थिक वाढीचा दर जरी कमी झाला तरीही मोठ्या बाजारपेठेतील मागणीमुळे याठिकाणी गुंतवणूक सुरु राहिल. 2025 पर्यंत माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन, डिजिटल संचार सेवा आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन यासारख्या मुख्य डिजिटल क्षेत्रांचा आकार दुप्पट होऊ शकेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.
Tag-Indian Economy/Flexible/United Nations/Report
PL/KA/PL/30 DEC 2020

mmc

Related post