भारतीय भटका कुत्रा ‘आलोका’ अमेरिकेतील शांतता पदयात्रेत सहभागी
वॉशिग्टन डीसी, दि. 6 : भारतीय भटका कुत्रा ‘आलोका’ आता अमेरिकेत बौद्ध भिक्षूंनी आयोजित केलेल्या 2,300 मैलांच्या शांतता पदयात्रेत सहभागी झाला आहे. एकेकाळी भारतातील रस्त्यावर भटकणारा हा कुत्रा आज करुणा, अहिंसा आणि शांततेचा प्रतीक बनला आहे. भारतातील धुळीच्या रस्त्यावरून सुरू झालेला एका भटक्या कुत्र्याचा प्रवास आज जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘आलोका’ नावाचा हा भारतीय कुत्रा एकेकाळी रस्त्यावर भटकत होता, त्याला ना घर होते, ना कॉलर, ना माणसांवर विश्वास ठेवण्याचे कारण. मात्र बौद्ध भिक्षूंच्या पदयात्रेत तो सामील झाला आणि ११२ दिवस भारतभर भिक्षूंसोबत चालत राहिला. उन्हात, पावसात, वाहतुकीत आणि अपघातातही त्याने हार मानली नाही. वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला, आजारी पडला, पण भिक्षूंनी त्याची काळजी घेतली आणि त्याला पुन्हा उभे केले.
आज आलोका फक्त भारतीय भटका कुत्रा राहिलेला नाही. तो ‘Peace Dog’ म्हणून ओळखला जातो आणि अमेरिकेत सुरू असलेल्या २,३०० मैलांच्या (३,७०१ किमी) शांतता यात्रेत सहभागी झाला आहे. ही यात्रा १० राज्यांतून ११० दिवस चालणार असून तिचा उद्देश करुणा, सजगता (mindfulness) आणि अहिंसा यांचा संदेश देणे आहे.
या यात्रेत आलोका हिरव्या रंगाच्या जॅकेटमध्ये भिक्षूंना पुढे नेताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे १.४४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि दररोज त्याच्या पोस्ट्सवर जगभरातील लोक प्रेम व्यक्त करत आहेत.
SL/ML/SL