भारतीय मुत्सुद्द्देगिरी यशस्वी, कतारने रद्द केली नौसैनिकांची फाशी

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमीर एच एच शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतल्यानंतर कतारच्या अपील न्यायालयाने आठ निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलेली फाशीची शिक्षा कमी केली आहे.कथित हेरगिरीच्या आरोपाखाली कतार तुरुंगात असलेल्या आठ भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कतारच्या न्यायालयानं त्याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. भारत सरकारच्या कूटनीतीचं हे यश मानलं जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपील न्यायालयाच्या आजच्या निकालाची नोंद घेतली आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे.”
कतारमधील दाहरा ग्लोबल प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ‘अल-जाहिरा अल-अलमी कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस’ या कंपनीसाठी काम करणाऱ्या ८ भारतीयांना कतार न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली होती. हे सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकारनं तात्काळ हालचाली करून कतार सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय या प्रकरणावर बारकाईनं लक्ष ठेवून होतं. पीडित अधिकाऱ्यांना कतारमधील भारतीय दूतावासाकडून मदत केली जात होती. तसंच, कायदेशीर मार्गानंही अधिकाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते. या सर्व प्रयत्नांना काही प्रमाणात यश आलं आहे. कतार न्यायालयानं सर्व अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा स्थगित करून त्यांना जन्मठेप सुनावली आहे.
SL/KA/SL
28 Dec. 2023