NASA कडून अंतराळात पाठवण्यात येणार भारतीय अंतराळवीर
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेचे माजी पायलट विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हिएत इंटरकोसमॉस कार्यक्रमाचा भाग म्हणून 3 एप्रिल 1984 रोजी सोयुझ टी-11 द्वारे अंतराळात उड्डाण केले होते. अंतराळात प्रवास करणारे ते एकमेव भारतीय नागरिक आहेत. त्यानंतर अंतराळात उड्डाण करणारे सर्व अवकाशवीर भारतीय वंशाचे होते. राकेश शर्मा यांच्या नंतर आता तब्बल ४० वर्षांनी भारतीय व्यक्ती अंतराळात जाणार आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा 2024 च्या अखेरीस एका भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे.
चांद्रयान-3 या चांद्र मोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर जगभरात भारतासह ISRO ची प्रतिष्ठा वाढली आहे. जगातील अनेक देश भारतासोबत अंतराळ मोहिमांवर काम करण्यास इच्छुक आहेत. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) चे अधिकारी बिल नेल्सन यांनी यांनी याबाबत सांगितले की, भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये पाठवण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे. अंतराळात अंतराळवीरांची निवड इस्रोकडून केली जाणार आहे. इस्रो या मोहिमेवर काम करत आहे.
बिल नेल्सन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. नेल्सन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि चांद्रयान-3 लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अंतराळात पाऊल ठेवणारे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचीही ते भेट घेणार आहेत. यानंतर नेल्सन यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, ‘भारत हा अमेरिकेसाठी एक उत्तम भागीदार आहे. आगामी काळात अंतराळातील अनेक मोहिमा सोबत आखण्याची तयारी आहे. अमेरिका पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खाजगी लँडर्स सोडणार आहे. पण तिथे पोहोचणारा भारत हा पहिला देश होता, यामुळे भारत अभिनंदनास पात्र आहे.’
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्याचे टार्गेट इस्रोला दिले आहे. याशिवाय 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
ML/KA/SL
29 Nov. 2023